आडते असोसिएशनची निवडणूक लागणार? अर्जावर १५ नोव्हेंबरपूर्वी निर्णय घेण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

पुणे – मार्केट यार्ड येथील फळ-भाजीपाला विभागातील आडत्यांची संघटना असलेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनची निवडणूक धर्मादाय आयुक्त प्रतिनिधीच्या अधिपत्याखाली घेण्यावर १५ नोव्हेंबरपूर्वी निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने दिला आहे.
पुणे विभागाचे सहायक धर्मादाय आयुक्त प्रथमेश भोसले यांना हा आदेश दिला आहे. भोसले यांच्या समोर दोन्ही बाजूंची म्हणणे दाखल करण्यात आले आहे. यावर मंगळवारी (दि.२८) सुनावणी होणार आहे. या दिवशी निवडणूक घेण्याचा आदेश देणार का नाही, याकडे आडत्यांसह बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.
आडते असोसिएशनची निवडणूक दर ३ वर्षांनी होत असते. डिसेंबर २०२४ मध्ये मुदत संपल्याने निवडणूक होणे अपेक्षित होते. निवडणूक घेण्यासाठी विलास भुजबळ आणि आपासाहेब खिरीड यांनी येथील धर्मादाय कार्यालयात अर्ज केला होता.
मात्र, विविध कारणांनी सुनावणीस विलंब होत असल्याने माजी उपाध्यक्ष अमोल घुले यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी अॅड. राहुल कदम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.
यामध्ये आडते असोसिएशनची निवडणूक धर्मादाय आयुक्त प्रतिनिधीच्या अधिपत्याखाली घ्यावी, अशी मागणी करण्यात आले होती. यावर सुनावणी करत उच्च न्यायालयाने १५ नोव्हेंबर पर्यंत निर्णय घेण्याचा आदेश सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना दिला आहे.
कार्यकारिणीची मुदत संपली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रीया पूर्ण होऊन निष्पक्ष व लोकशाही मार्गाने निवडणूक व्हावी, ही आमची मागणी आहे.
– विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, आडते असोसिएशन





