Devendra Fadnavis : भाषेच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा तापला असताना मनसे कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी मराठी भाषा न बोलल्याच्या कारणावरून जोधपूर स्वीट्स अँड फरसाणचे मालक बाबूलाल चौधरी यांना, मराठीचा अपमान केल्याच्या आरोपावरून मारहाण केली होती. बाबूलाल यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणात व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताना, मराठी भाषेचा अभिमान असणे चुकीचे नाही, पण भाषेच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही. भाषेवरुन वाद घालणाऱ्या, मारहाण करणाऱ्या आणि गुंडशाहीवर कडक कारवाई केली जाईल, असे म्हणताना संबंधीतांना थेट इशारा दिला.
राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्रिभाषासूत्रीचा निर्णय स्वीकारणारे उद्धव ठाकरेच, त्यात उपनेत्याला ढकलणारे तेच, निर्णय कॅबिनेटमध्ये घेणारे तेच आणि समिती नेमणारे देखील तेच आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.
आम्ही याबाबत समिती नेमलेली आहे, त्याचा जो अहवाल येईल त्याची अंमलबजवाणी केली जाईल, जी विद्यार्थ्यांच्या हिताची असेल. मुंबईत भाषेवरून व्यक्तींना होत असलेली मारहाण सहन केली जाणार नाही, आम्हालाही मराठी भाषा प्रिय आहे. पण, भाषेवरुन गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही फडणवीसांनी ठणकावून सांगितले.
दारञान, व्यापाऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. एखादा मराठी व्यापारी आसाममध्ये जाऊन भाषा शिकायला वेळ लागत असेल तर त्याला मारहाण करणार का, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला. खरा अभिमान असेल तर मराठी भाषा शिकवा, क्लासेस घ्या, इंग्रजीला का मग गळे लावता. स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकायचे आणि मराठीसाठी गळा काढायचा, असे म्हणत ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे टीका देखील केली.





