Pune District : एनडीएसोबत जाणार नाही : शरद पवार
Pune District : शरद पवार यांनी गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा केंद्रात एनडीएसोबत आणि राज्यात महायुतीसोबत अजिबात जाणार नाही. दोन्ही चर्चेत अजिबात तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. पवार यांनी महिनाभरापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, होऊ घातलेली राजकीय उलथापालथ ही पेल्यातील वादळ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी ही माहिती दिली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएशी जुळवून घेण्याचे प्रयत्न करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. शरद पवार यांनी गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
भेटीनंतर राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभाग निश्चित असल्याचे मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चेचे शरद पवार यांनी खंडन करीत यावर पदडा टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होऊन सत्ताधारी गटात सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाला राज्यात दोन मंत्रिपदे आणि केंद्रात एक मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. हाच प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. यावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची अजिबात चर्चा सुरू नाही, असे सांगत पवार यांनी विलिनीकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे.
दुसरीकडे पवार यांनी राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार का? या प्रश्नावरही स्पष्टपणे उत्तर दिले आहे. दोन्ही चर्चा या तथ्यहिन असल्याचे त्यांनी सांगून विलिनीकरणाची हवाच काढून घेतली.
शिंदे, तटकरे भेटीत काय दडले?
शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पवार यांच्या राष्ट्रवादीची एनडीएमध्ये एन्ट्रीच्या चर्चेने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता होती. त्यातूनच एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांनी दिल्ली दरबारी जात अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे शिंदे, तटकरे यांच्या दिल्ली भेटीत काय दडले होते, अशी चर्चा राजकीय वर्तृळात सुरू झाली आहे.





