पुणे : नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजपसह महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. २६ डिसेंबरला दोन्ही ‘राष्ट्रवादी’ पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर महत्त्वाची भूमिका मांडली आहे. “माझ्याकडे अद्याप कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही,” असे स्पष्ट करत सुळेंनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. ‘प्रस्ताव नाही, पण चर्चा सुरू’- पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आघाड्या कशा करायच्या याबाबत अनेक पातळ्यांवर नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. जोपर्यंत ठोस काही हाती येत नाही, तोपर्यंत अधिकृत भाष्य करणे कठीण आहे. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाईल.” पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि आपल्यात दोन तास चर्चा झाली असून विविध पर्यायांवर विचारमंथन सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. नातीगोती आणि कार्यकर्त्यांचे हित- अजित पवार गटाशी होणाऱ्या चर्चेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “अजित पवार आणि आमच्या लोकांच्या काही चर्चा नक्कीच सुरू आहेत. इतक्या वर्षांच्या ओळखी आणि नातीगोती आहेतच. शेवटी या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना आणि पुणेकरांना केंद्रबिंदू ठेवूनच विकासाच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतला जाईल.” महाविकास आघाडीचे काय? राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत सुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. “मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी आमची चर्चा सुरू असून जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. आमचा प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधू, काँग्रेस आणि आम्ही सर्वांनी एकत्र लढण्याचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना, “ठाकरे बंधूंची युती होणे ही बाळासाहेब ठाकरेंना सर्वात मोठी आदरांजली ठरेल,” असेही त्या म्हणाल्या. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन- प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिला. “प्रशांत जगताप यांनी कोणताही राजीनामा दिलेला नाही. कोणी खोट्या बातम्या पसरवल्या मला माहीत नाही,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. २६ डिसेंबरच्या मुहूर्ताबाबत अद्याप संभ्रम असला तरी, सुप्रिया सुळे यांच्या विधानामुळे राजकीय चर्चेला नवी फोडणी मिळाली आहे.