Supriya sule : एकाच पावसात महाराष्ट्र ठप्प, ‘इमर्जन्सी’ जाहीर करा.! सुप्रिया सुळेंची मागणी
अवघ्या एका पावसात संपूर्ण महाराष्ट्र ठप्प झाला आहे. सत्ताधारी पक्ष सातत्याने ७० वर्षांचा हिशोब मागतो, मात्र मागील १०–१२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरकारच्या कामाचा हिशोब कोण देणार

Supriya sule | Maharashtra rain : राज्यात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई–पुणे महामार्गासह अनेक महत्त्वाचे मार्ग ठप्प झाले आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीवरून राजकीय वातावरणही तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका करत प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून सरकारवर टीका वाढली आहे.
या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “एवढे मोठे प्रकल्प करताना सरकारने पर्यावरणाचा विचारच केलेला नाही.
परिणामी, अवघ्या एका पावसात संपूर्ण महाराष्ट्र ठप्प झाला आहे. सत्ताधारी पक्ष सातत्याने ७० वर्षांचा हिशोब मागतो, मात्र मागील १०–१२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरकारच्या कामाचा हिशोब कोण देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : Maharashtra Rain : महाराष्ट्र ‘हाय अलर्ट’वर! ८ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; पूर आढाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
सोमवारी सकाळी सुप्रिया सुळे यांनी महापालिकेला भेट देऊन सुरू असलेल्या आपत्कालीन कामांचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुणे–मुंबई कनेक्टिव्हिटी पूर्णपणे ठप्प होणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले.
“हे सरकार स्वतःला इन्फ्रास्ट्रक्चरचे सरकार म्हणवते, पण नागरिकांची सुरक्षा आणि पर्यावरणाचा विचारच होत नाही,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले तसेच राज्यात तातडीने ‘आपत्कालीन स्थिती’ (एमर्जन्सी) घोषित करण्याची मागणी केली.
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाबाबत बोलताना सुळे यांनी प्रकल्पाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “प्रकल्पाचे व्हिडिओ पाहिल्यावर सुरुवातीला ते एआयने तयार केलेले आहेत का, असा संशय आला. पण प्रत्यक्षात परिस्थिती अतिशय गंभीर आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करूनही कामात विसंगती दिसत आहे. या प्रकल्पाच्या खर्चाचे ऑडिट झाले आहे का, याची चौकशी व्हावी आणि संपूर्ण कामाची पारदर्शक तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुसळधार पावसामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर बनली असताना राजकीय आरोप–प्रत्यारोपही तीव्र झाले आहेत. दुसरीकडे ‘मिसिंग लिंक’सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवरून सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.







