प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटप अद्याप निश्चित झालेले नसले, तरी भाजपने उमेदवारांची पहिली यादी अंतिम केली असल्याची चर्चा आहे.या यादीत सुमारे ६२ नावांचा समावेश असून, ही यादी २६ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पहिली यादी, तसेच महायुतीमधील जागा वाटपाबाबत उद्या ( मंगळवारी) मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी भाजपमध्ये पुण्यातील रखडलेल्या माजी नगरसेवकांचे प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युतीबाबात अद्याप निर्णय झालेला नाही. शिवसेनेकडून काही जागांची यादी देण्यात आली आहे. पक्षातील वरीष्ठ नेते या जागांबाबत निर्णय घेणार आहेत. मागील निवडणुकीत ज्या जागेवर भाजप निवडून आले होते, त्या जागांवरील उमेदवारांची पहिली यादी येत्या २६ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भाजपकडे सध्या १०५ माजी नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे या जागांवर भाजप कोणताच फेरबदल करणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर अन्य पक्षांतून आलेल्या ११ माजी नगरसेवक, तसेच पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपकडून महापालिकेत सध्या १२६ जागांवर दावा निश्चित केल्याचे चित्र आहे. शिवसेनेने भाजपकडे ३५ जागांची मागणी केली आहे. भाजपने १२० जागा जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे समाविष्ट झाल्यास भाजपला किमान १४५ जागा लढवाव्या लागणार आहेत. त्यामुळे शिवसेनेला केवळ १५ ते २० जागा देणेच शक्य असल्याचे स्थानिक पातळीवर सांगण्यात येत आहे.