Supriya Sule : शरद पवार गट एनडीएत सहभागी होणार? सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात सांगितलं; माजी मुख्यमंत्र्यांच्या त्या दाव्यावर म्हणाल्या…
Supriya Sule : एनडीएसोबत शरद पवार यांचा पक्ष सहभागी होणार असल्याच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Supriya Sule : जेष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात उधाण आले होते. या चर्चा होण्यामागे तशा घडामोडी देखील घडल्या आहेत.
पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांची मुंबईतील पंचतारांकित हॅाटेलमध्ये झालेली भेट. या भेटीनंटर शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएसोबत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले.
आता एनडीएसोबत शरद पवार यांचा पक्ष सहभागी होणार असल्याच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. (Supriya Sule)
सुळे म्हणाल्या, “आमच्याशी कोणी बोलत नाही आणि आम्हीही कुणाशी बोलत नाही. भाजपसोबत जाण्याचा विषय आमच्या चर्चेतच नाही. या चर्चा केवळ वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्सपुरत्याच मर्यादित आहेत.”
‘सूत्रांच्या’ आधारे येणाऱ्या बातम्यांवरही सुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली. त्या सूत्रांची मला गंमत वाटते, असं त्या म्हणाल्या.
शरद पवार यांचा उल्लेख करताना सुळे म्हणाल्या, “चांगली किंवा वाईट, आपली बातमी सुरू आहे म्हणजे आपलं नाणं अजूनही खणखणीत आहे, असे पवार साहेब नेहमी सांगतात. गेली १२ वर्षे माझ्या शपथविधीच्या बातम्या सुरू आहेत. त्यामुळे अशा चर्चांकडे आम्ही फार गांभीर्याने पाहत नाही.” असे सुळेंनी स्पष्टपणे सांगितलं.
आता तो विषय संपला : सुप्रिया सुळे
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “अजितदादांची सर्वांनी एकत्र यावे अशी इच्छा होती. त्या संदर्भात काही चर्चा झाल्या होत्या. मात्र आता तो विषय संपला आहे. आम्ही आमच्या मार्गाने आणि ते त्यांच्या मार्गाने जात आहेत. सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची कोणतीही चर्चा सुरू नाही,” असे स्पष्ट करत सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला. (Supriya Sule)
पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर सुळे म्हणाल्या….
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया समोर आल्या. या भेटीवर संजय राऊत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते असे विधान केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार गटातील खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला. हा दावा फेटाळून लावत सुप्रिया सुळे यांनी “आमच्या पक्षातील कोणताही खासदार अस्वस्थ नाही. आम्ही सर्वजण नियमित संपर्कात असतो, भेटतो आणि विविध विषयांवर चर्चा करतो,” असे त्या म्हणाल्या.





