प्रभात वृत्तसेवा पुणे – महाबळेश्वर, पाचगणी पर्यटनस्थळ हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण. आता हिवाळा सुरू झाल्यामुळे महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांना आरामदायी, वातानुकुलीत पर्यावरणपुरक प्रवासासाठी स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे.स्वारगेट-महाबळेश्वर-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई वातानुकूलित बसच्या एकूण चार फेऱ्या नियोजित आहेत. स्वारगेटला सकाळी साडेपाच, साडेसहा तर दुपारी तीन, चार वाजता बस सुटणार आहे. महाबळेश्वर येथून अनुक्रमे सकाळी नऊ, दहा तर सायंकाळी साडेसहा, साडेसात वाजता परतीच्या फेऱ्या असतील. या सर्व फेऱ्यांसाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. प्रवाशांनी आरक्षणासाठी एमएसआरटीसीचे अधिकृत मोबाईल ॲप तसेच https://npublic.msrtcors.com/ या संकेतस्थळाचा वापर करता येईल.स्वारगेट बसस्थानक येथेही थेट आरक्षणाची सोय उपलब्ध आहे. नव्या ई-शिवाई बसचा लाभ घेऊन सुरक्षित व आरामदायी प्रवास पर्यटकांना करता येईल. महिला, ज्येष्ठांना सवलत सर्व ई-बसेस पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आरामदायी आसनव्यवस्था, मोबाईल चार्जिंग पॉईंट्स आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत असून ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना विनामूल्य बस प्रवास उपलब्ध आहे. पर्यटकांकडून सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. खासगी वाहनांचा खर्च टाळून कमी दरात आरामदायी, पर्यावरण पूरक प्रवासाचा आनंद प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.