Wildflowers Raireswar: रायरेश्वर पठाराने पांघरला रंगीबेरंगी फुलांचा गालिचा! सप्टेंबर ते नोव्हेंबर चालणारा निसर्गसोहळा पाहिलात का?
Wildflowers Raireswar: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या ऐतिहासिक रायरेश्वर पठारावर सोनकी, तेरडा, रानहळद अशा विविध रानफुलांची निसर्गनिर्मित उधळण.

Wildflowers Raireswar- छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या ऐतिहासिक रायरेश्वर पठाराने सध्या विलोभनीय रूप धारण केले आहे. काळ्या कातळावर पसरलेला हिरवागार गालिचा आणि त्यावर उमललेली विविध रंगांची रानफुले यामुळे संपूर्ण पठाराचे रूपच पालटले आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान फुलणाऱ्या या रानफुलांचा बहर पाहण्यासाठी निसर्गप्रेमी, पर्यटक आणि निसर्ग अभ्यासकांची रायरेश्वरकडे मोठी गर्दी होत आहे.
भोरपासून सुमारे २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायरेश्वर पठाराला ऐतिहासिक तसेच नैसर्गिक महत्त्व आहे. सुमारे सात किलोमीटर लांब आणि अडीच किलोमीटर रुंद असलेल्या या विस्तीर्ण पठारावर सध्या १० ते १५ प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची उधळण पाहायला मिळत आहे. हिरव्यागार गवतावर उमललेली ही फुले वाऱ्याच्या झुळुकीसोबत डोलताना पाहणे हा पर्यटकांसाठी नयनरम्य अनुभव ठरत आहे.
या फुलांमध्ये सोनकी, चवर, तेरडा, रानहळद, पांढरा कुंडा, पानतेरडा, बेशरम, बुई, दीपकांती, बेवडी, पांढरा साप कांदा आदी विविध रानफुलांचा समावेश आहे. पिवळा, पांढरा, गुलाबी, जांभळा अशा विविध रंगांनी सजलेले पठार एखाद्या निसर्गनिर्मित रंगीबेरंगी गालिच्यासारखे भासत आहे.
धुके, धबधबे अन् फुलांचा बहर
सध्या रायरेश्वर परिसरात ऊन-पावसाचा खेळ सुरू असून डोंगरकड्यांवरून कोसळणारे धबधबे, दाट धुके, हिरवाई आणि फुलांचा बहर यामुळे परिसराला स्वर्गीय सौंदर्य लाभले आहे. श्रावणापासूनच पर्यटकांची येथे वर्दळ वाढते. सप्टेंबर ते नोव्हेंबर हा रानफुलांचा मुख्य बहराचा काळ असल्याने या कालावधीत निसर्गप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अनेक निसर्ग अभ्यासक दिवसभर पठारावर भटकंती करून येथील विविध वनस्पती आणि रानफुलांचा अभ्यास करतात.
इतिहासाचीही साक्ष देणारी भूमी
रायरेश्वर केवळ निसर्गसौंदर्यासाठीच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेल्या स्मृतींसाठीही प्रसिद्ध आहे. याच भूमीवर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे इतिहासप्रेमींसाठीही रायरेश्वर हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. पठारावर ऐतिहासिक शिवमंदिर असून येथे जिवंत पाण्याचे झरे, गायमुख तसेच शंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या देखभालीसाठी शिवकालात कर्नाटकातून ‘शिवा’ नावाच्या जंगम कुटुंबाला येथे आणण्यात आल्याचे सांगितले जाते.
विविध वाटांनी रायरेश्वर गाठता येते
रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. कोर्ले गावातून पुढे गेल्यानंतर डोंगराला लावलेल्या शिडीच्या मार्गाने पठारावर जाता येते. रायरी गावाजवळील काही ठिकाणी अवघड चढण असलेली पायवाट आहे. तसेच धारांबेच्या दिशेने डोंगराला लावलेल्या लोखंडी शिडीच्या मार्गानेही किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ल्याच्या पायथ्याशी वाहनतळाची सुविधा असून स्थानिक नागरिकांकडून पर्यटकांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाते.






