मुंबईत CNGचा तुटवडा का निर्माण झाला, कधीपासून सुरळीत होणार पुरवठा? महत्त्वाची अपडेट आली समोर

मुंबई : मुंबईतील एका सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने त्याचा इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे मुंबईत सीएनजी पंपांवर ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वडाळा येथील गॅस पुरवठा थांबल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील काही सीएनजी स्टेशन बंद होते. यामुळे शहरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
महानगर गॅस लिमिटेडने सांगितले की, दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून पंपांना सीएनजी गॅस पुरवठा मंगळवारी दुपारपर्यंत पूर्ववत होईल. तसेच गॅस पुरवठा करणाऱ्या ३८९ सीएनजी पंपांपैकी जवळजवळ ६० टक्के पंप सुरू आहे. तसेच घरांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा सुरू झाला आहे, अशी माहिती दिली. स्थानिक पेट्रोल डीलर्स संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, कमी गॅस प्रेशरमुळे शहरातील अनेक सीएनजी पंप सकाळपासून बंद आहेत.
यामुळे सीएनजीवर अवलंबून असलेल्या वाहनांना पुरवठा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे सार्वजनिक आणि खासगी वाहतूकीवर परिणाम झाला. दरम्यान, आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पुरवठा पाइपलाइनमध्ये बिघाड झाला आहे. ज्यामुळे मुंबईला गॅस पुरवठ्यासाठी एक प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या वडाळा येथील सिटी गेट स्टेशन (सीजीएस) कडे जाणारा प्रवाह प्रभावित झाला आहे. मुंबईत एमजीएलच्या स्वतःच्या सुविधांसह १३० ते १४० सीएनजी पंप आहेत.





