धंगेकरांनी ‘शिवसेनेत’च जाण्याचा निर्णय का घेतला? यामागची राजकीय गणित काय आहेत…. जाणून घ्या 5 महत्वाच्या गोष्टी

रविंद्र धंगेकर. पुणे शहरातील काँग्रेसचा आक्रमक चेहरा…विविध आंदोलनात सक्रिय सहभाग….बोलण्याची आक्रमक शैली….शहरात काँग्रेसला उभारी देण्यासाठी महत्वाचा वाटा…अशा एक ना अनेक गोष्टी कसबा विधानसभेचे माजी आमदार रविंद्र धंगेकरांना लागू होतात. त्यांनी नुकताच काँग्रेसचा हात सोडत आपल्या हाती धनुष्यबाण घेतले आहे. शिवसेना (शिंदे) सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धंगेकरांनी पक्षात जाहीर प्रवेश केला.
धंगेकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात होती. पण धंगेकर अधिकृतरित्या शिवसेनेत पक्ष प्रवेश कधी करणार याबाबत सांगण्यात येत नव्हते. अखेर त्यांचा पक्ष प्रवेश झाला आणि आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा झडू लागल्या आहेत. धंगेकरांनी शिवसेनेत जाण्याचा पर्याय का निवडला असावा, शिंदेंना धंगेकर यांना पक्षात घेण्याबाबत कोणता विचार असू शकतो, धंगकरांच्या पक्ष प्रवेशानंतर काँग्रेसचं काय होणार आदी विषय जाणून घेऊयात….
१ आधी चर्चा आणि मग पूर्णविराम
धंगेकर हे काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा ज्यावेळी मतदार संघातील विकासकामांसाठी शिंदे साहेबांची भेट घेतल्याचे रविंद्र धंगेकर यांनी स्वताःह सांगितल्यानंतर होऊ लागली होती. त्यांच्या सोबत माजी आमदार महादेव बाबर हे देखील शिंदेंच्या भेटीला गेले होते. त्यांनंतर धंगेकरांनी पक्ष प्रवेशाच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले होते. आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली होती.
त्यानंतर धंगेकरांचे सोशल मीडियावरील बदललेला फोटो चर्चेचा विषय बनला. त्यानंतर आले धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसाचे फोटो. या फोटोत शिवसेनेचे मंत्री आणि ज्यांच्यावर अॅापरेशन टायगरची मदार आहे, ते उदय सामंत होते. त्यांनी स्वतःह धंगेकरांच्या मुलाला केक भरवला. त्यानंतर धंगेकरांच्या शिवेसना पक्ष प्रवेशाच्या शक्यतेवर अंतरिम शिक्कामोर्तेब झाला. नुकताच धंगेकरांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करून होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
२ धंगेकरांचीच निवड का ?
पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 7 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. जिल्ह्यातील पुरंदर विधानसभेवर शिवसेनाचा आमदार निवडून आलेला आहे. तर जुन्नरमधील अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना पक्षात नुकताच पक्ष प्रवेश केला आहे. थोडक्यात पुणे शहराला शिवसेनेचा होल्ड असायला हवा, यामुळे धंगेकरांची निवड शिंदेंनी केली असावी असे कारण सांगितले जाते. धंगेकरचा इतिहास पाहिला तर त्यांची राजकारणातील सुरुवातीच ही १९९६ साली शिवसेनेतून झाली आहे.
पुण्यात पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांचा तळागळातील मतदारांशी जोडलेली नाळ याचा फायदा त्यांना पोटनिवडणुकीत झाला. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांनी धंगकरांचा पराभव केला. असे असले तरी धंगेकर यांची आक्रमक शैली, स्थानिक मुंद्यांची समज आदी गोष्टींच्या निकषावर त्यांना शिवसेनेत घेण्यात आले. खुद्द शिंदेंनीच धंगेकरांचे कौतुक करत ते ‘स्वगृही’ आल्याचे म्हटले.
३ भाजपला शह देण्याचा प्रयत्न
राज्यातील राजकारणाचा विचार केला असता प्रेस मुलाखतीमध्ये सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमची अदला बदल झाली असल्याची खदखद बोलून दाखवत आले आहेत. तर अजित पवार शिंदेंच्या विधानावर मिश्किल टिप्पनी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र काही न बोलता बरचं काही सांगून जात आहेत. पुणे शहराचा इतिहास पाहिला असता काँग्रेसच्या काळात कलमाडी यांचा मोठा दबदबा पुण्यात होता. त्यानंतर भाजपमधून गिरीष बापट हे नाव उद्याला आले आणि पुण्यात कमळ फुलत गेले.
पुणे महापालिकेवरही भाजपने आपला झेंडा फडकवा. पुणे शहराला लागूनच असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपने सत्ता आणली. सध्याचा विचार करता पुणे शहरात शिवसेनचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे शिवेसना शिंदे यांच्या शिवसेनचे प्रभावी नेतृत्व करणारा नेता नाही. आता धंगेकरांच्या रुपाने शिंदेंनी तो नेता गवसला आहे. ते त्या नेत्याचा प्रभावीपणे वापर करतील. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देखील त्यांना फायदा होऊ शकतो. हा भाजपला शह देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
४ काँग्रेसकडून टीका; भाजपमध्ये नाराजीचा सूर
धंगेकर यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी धंगेकरांनी आंदोलनात काँग्रेस पक्षाचा झेंडा उचलला नाही आणि खांद्यावरही घेतला नाही, असा आरोप केला आहे. तर दुसरीकडे धंगकरांच्या शिवसेनेत येण्यामुळे शहर भाजपमध्ये नाराजीचा सूर पसरत चाललेला आहे.
पण कोणीही उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवत नाहीये. धंगेकर हे शिवसेनेत आले म्हणजेच ते महायुतीमध्ये सामील झाले. लोकांची कामे सत्तेतसहभागी झाल्यावर करता येतील तसेच मतदारसंघातील लोकांची, कार्यकर्त्याची भावना असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. पक्ष प्रवेशाअगोदर त्यांनी काँग्रेस पक्षाचे देखील आभार मानले होते. मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर पसरत चाललेला आहे.
५ चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान
भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी धंगेकरांना घेण्याचा निर्णय केला असता, तर मग मी त्या विरोधात भांडलो असतो, असे विधान त्यांनी केले आहे. कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचे स्वातंत्र्य त्या त्या पक्षाला असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच धंगेकर यांच्यासोबत आमचा नुसता पंगा नाही. तर आम्ही एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. एकदा हरलो पण त्यांना दोनदा हरवल, राजकारण आणि समाजकारणामध्ये एखादी गोष्ट ही काळच्या ओघात बदलत असते, याची मानसिक तयारी असणारे आम्ही आहोत, असे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.





