D. K. Shivakumar – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी राज्यातील एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या कमतरतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राज्यात गॅसचा साठा संपत चालला असून, हॉटेल व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद करण्याचा इशारा दिला आहे. अशा गंभीर परिस्थितीतही भाजपचे खासदार गप्प का आहेत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले की, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्यामुळे हॉटेल आणि केटरिंग व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक हॉटेल मालकांनी आधीच आपले कामकाज मर्यादित केले असून, पुरवठा सुधारला नाही तर आस्थापने तात्पुरती बंद करावी लागतील, असा इशारा संघटनांनी दिला आहे. सिलेंडरचा साठा उपलब्ध नाही, किमती वाढत आहेत आणि लोक अडचणीत आहेत, तरीही भाजप खासदार या महत्त्वाच्या विषयावर संसदेत अवाक्षरही काढत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. एलपीजीचा पुरवठा आणि त्यांच्या किमती केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने, या विषयावर संसदेत तातडीने चर्चा होणे गरजेचे असल्याचे शिवकुमार यांनी नमूद केले. वाढत्या डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांवर आणि व्यापाऱ्यांवर दुहेरी आर्थिक बोजा पडत असल्याचेही त्यांनी सांगितले. देवेगौडांना प्रत्युत्तर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मेकेदाटू आणि येट्टीनाहोल प्रकल्पांवरून केलेल्या विधानांवर भाष्य करताना शिवकुमार म्हणाले, देवेगौडा ज्येष्ठ आहेत, त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. पण त्यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांना संसदेत इंधन टंचाई आणि गॅस तुटवड्यावर बोलण्याचे निर्देश द्यावेत. त्यांनी मेकेदाटू प्रकल्पासाठी ठोस उपाय सुचवावेत, आम्ही केलेल्या कामाचा हिशोब द्यायला आम्ही तयार असल्याचे शिवकुमार म्हणाले. एकूणच, कर्नाटकातील एलपीजी तुटवड्याचा प्रश्न आता राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असून, आगामी काळात हा मुद्दा संसदेत तापण्याची चिन्हे आहेत.