सुपर संडेला कोण मारणार बाजी ? मुंबई विरुद्ध गुजरात तर राजस्थानसमोर लखनौचे आव्हान

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या सुपर संडेचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात तर दुसरा सामना गुजरात जायंट्स विरुद्द मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. पहिला सामना हा जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर तर दुसरा गुजरातचे होमग्राउंड नरेंद्र मोदी मैदानावर होणार आहे.
राजस्थानला दुखापतग्रस्त प्रसिध कृष्णाची उणीव भासणार आहे, तर अँडम झाम्पानेही स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, लखनौसाठी के.एल. राहुल केवळ फलंदाज म्हणून मैदानात उतरेल. अशा परिस्थितीत तो विकेटकीपिंग करताना दिसणार नाही. देवदत्त पडिकल लखनौच्या सामन्यातून पदार्पण करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. देवदत्त गेल्या मोसमात राजस्थानमध्ये होता. अशा परिस्थितीत तो आपल्या जुन्या संघाविरुद्ध वादळ निर्माण करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असेल.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा मजबूत खेळाडू रोव्हमन पॉवेल राजस्थान रॉयल्सच्या फिनिशरची भूमिका बजावू शकतो. यामुळे शिमरॉन हेटमायर, रायन पराग आणि ध्रुव जुरेल या संघाची मधली फळी आणखी मजबूत होईल. या मोसमापूर्वी लखनौहून ट्रेड झाल्यानंतर वेगवान गोलंदाज आवेश खानही राजस्थानला आला असून तोही पदार्पण करण्याची शक्यता आहे.
पंड्याच्या नेतृत्वाचा कस
मुंबईचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पंड्या रविवारी त्याचा पूर्वीचा संघ गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना दिसणार आहे. त्याच्यावर रोहित शर्माच्या चाहत्यांचा रोष शमविण्याचा जबाबदारी असणार आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टायटन्सने पदार्पणाच्या मोसमातच विजेतेपद पटकावले होते तर गेल्या वेळी ते उपविजेते होते. मात्र, पंड्या या मोसमात पुन्हा मुंबईत दाखल झाला आणि रोहितच्या जागी त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे पहिल्याच सामन्यात त्याच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.





