‘Bajaj Pune Grand Tour 2026: ‘मध्ये दिसणारा हा प्राणी कोण आणि का निवडला गेला? ‘इंदू’ची रंजक कहाणी काय?
गोंडस, देखणा आणि तितकाच अभिमानास्पद असलेला ‘इंदू’ आता केवळ एका क्रीडा स्पर्धेचे प्रतिक राहिलेला नाही.

Bajaj Pune Grand Tour 2026 : सध्या पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा थरार, उत्साह आणि रंगत अनुभवायला मिळत आहे. पहिल्यांदाच भारतात होत असलेल्या या भव्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेने केवळ क्रीडाप्रेमींचेच नव्हे, तर निसर्गप्रेमींचेही लक्ष वेधून घेतले आहे.
आज या (Bajaj Pune Grand Tour 2026) स्पर्धेचा शेवट असला तरी, यामागचे मुख्य कारण ठरतेय या स्पर्धेचा शुभंकर ‘इंदू’, म्हणजेच महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’. गोंडस, देखणा आणि तितकाच अभिमानास्पद असलेला ‘इंदू’ आता केवळ एका क्रीडा स्पर्धेचे प्रतिक राहिलेला नाही.
तो महाराष्ट्राच्या समृद्ध जैवविविधतेचा, सह्याद्रीच्या निसर्गवैभवाचा आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाचा जागतिक प्रतिनिधी बनला आहे. पुणे शहर असो वा जिल्ह्यातील दुर्गम गावखेडी, सर्वत्र ‘इंदू’चीच चर्चा रंगताना दिसत आहे.
शेकरू आणि पुण्याचे अतूट नाते काय?
शेकरू आणि पुणे जिल्ह्याचे नाते समजून घ्यायचे असेल, तर आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर अभयारण्याच्या घनदाट जंगलात डोकावावे लागेल. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे अभयारण्य समुद्रसपाटीपासून सुमारे १,२०० मीटर उंचीवर वसले असून सुमारे १३,७८० हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. १९८५ साली या परिसराला अधिकृतपणे अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.
दरवर्षी साधारण ४,००० मिमी पावसामुळे येथील जंगल सदैव हिरवेगार राहते. या निसर्गसंपत्तीचे जतन करण्यात स्थानिक आदिवासी बांधवांनी आणि पारंपरिक ‘देवराई’ संस्कृतीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा संपूर्ण परिसर निसर्गाने नटलेला असून, पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे.
‘शेकरू’ आहे सह्याद्रीचा मानबिंदू
या अभयारण्याचा खरा मानबिंदू म्हणजे शेकरू (Giant Squirrel). शास्त्रीय नाव ‘Ratufa indica’ असलेला हा प्राणी महाराष्ट्राचा राज्यप्राणी असून भीमाशंकर अभयारण्याची स्थापनाच मुख्यत्वे शेकरूच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी करण्यात आली होती. स्थानिक लोक त्याला प्रेमाने ‘भीमाशंकरी’ असेही म्हणतात.
शेकरूचे रूप अत्यंत आकर्षक असते :
तांबूस-तपकिरी रंगाचे मऊ केस, गुंजिसारखे लालसर डोळे, पोटावर पिवळसर पट्टा आणि लांबलचक, झुपकेदार शेपूट हा प्राणी प्रामुख्याने झाडांवर राहतो.
फळे, फुले, बिया आणि झाडांची साल हे त्याचे मुख्य अन्न. अत्यंत लाजाळू आणि एकांतप्रिय स्वभावामुळे शेकरू सहसा सहज दिसत नाही. विशेष म्हणजे, हा प्राणी वर्षातून फक्त एकदाच एक पिल्लू जन्माला घालतो.
‘इंदू’ ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठ :
अशा या दुर्मिळ, देखण्या आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या शेकरूची निवड ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’च्या शुभंकरासाठी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय क्रीडा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवणारा ठरत आहे.
या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत देश-विदेशातील नामवंत सायकलपटू सहभागी झाले असून, पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य मार्गांवरून ही स्पर्धा पार पडत आहे. या माध्यमातून जगभरातील खेळाडू, पर्यटक आणि क्रीडाप्रेमींना महाराष्ट्राचा राज्यप्राणी, सह्याद्रीचे जंगल आणि भीमाशंकरचे निसर्गवैभव जवळून अनुभवता येत आहे.
शेकरूला ‘इंदू’ नाव का देण्यात आलं?
या मॅस्कॉटला ‘इंदू’ हे नाव इंद्रायणी नदीवरून देण्यात आले आहे. जशी इंद्रायणी नदी माणूस, निसर्ग आणि श्रद्धेला जोडते, तसाच संदेश खेळ, पर्यावरण आणि समाज यांच्यातील नाते दृढ करण्याचा ‘इंदू’ देतो. म्हणूनच शेकरूला ‘इंदू’ नाव देण्यात आलं आहे.
हे देखील नक्की वाचा….
Sharad Pawar Ajit Pawar Reunion : दोन्ही ‘राष्ट्रवादी’ पुन्हा एकत्र; थेट भाजपाला देणार टक्कर
मोठी बातमी..! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता






