Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका
या जहाजावरील सर्व २३ भारतीय कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले असून त्यांच्यापैकी कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

Oil tanker attack – काळ्या समुद्रामध्ये लायबेरियाचा ध्वज असलेल्या एका जहाजावर ड्रोन बोटीद्वारे हल्ला करण्यात आला असून या जहाजावर असलेल्या भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना किनाऱ्यावर सुखरुपपणे आणण्यात आले आहे, असे रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
रशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सरकारी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. अफ्रामॅक्स रिओ असे या टँकरचे नाव असून मंगळवारी या जहाजावर ड्रोन बोटीद्वारे हल्ला करण्यात आला होता. याशिवाय जहाजावर गोळीबार देखील झाला होता, असे रशियाच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले.
या जहाजावरील सर्व २३ भारतीय कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले असून त्यांच्यापैकी कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. ही घटना काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर सोची या रशियाच्या लोकप्रिय रिसोर्ट शहराजवळ घडली.
रशियाचे परिवहन मंत्री आंद्रे निकितिन यांनी काळ्या समुद्राच्या किनाऱ्याजवळ अफ्रामॅक्स रिओ टँकरवर झालेल्या हल्ल्याचे परिणाम हटवण्यासंदर्भात मुख्यालयात एक तातडीची बैठक घेतली.
या जहाजावर झालेला हल्ला इतका तीव्र स्वरुपाचा होता, की त्यामुळे लागलेली आग विझवण्यासाठी लगेच काम सुरू करता आले नाही. टँकरवरच्या तेलाने पेट घेतला असून काळ्या समुद्रात हा टँकर अजूनही पेटलेला आहे. ही आग कमी झाल्यानंतरच अग्निशामक पथक टँकरवर ताबा मिळवू शकतील.
खबरदारीचा उपाय म्हणून, सोचीचे महापौर आंद्रे प्रोशुनिन यांनी शहरातील समुद्रकिनाऱ्यांवरील प्रवेश तात्पुरता बंद केला आहे. सोचीचे रहिवासी आणि पाहुण्यांना किनाऱ्याजवळ न जाण्याची सूचना करण्यात आली असून अधिकाऱ्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याची सूचना करण्यात आली आहे.
एका अन्य हल्ल्यात एक भारतीय जखमी
दोनच दिवसांपुर्वी मालवाहतूक करणाऱ्या जहाजावर रशियाच्या ड्रोन हल्ल्यात दोन जण ठार झाले होते आणि काही कर्मचारी जखमी झाले होते. जखमींमध्ये तीन भारतीयांचा समावेश होता. एमव्ही रोयाद मम्मादोवमधून तीन भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी जखमी झालेल्या तिसऱ्यावर कॉन्स्टँटा येथील काउंटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती रोमानियातील भारतीय दूतावासाने दिली.
व्यापारी जहाजांवर आणि कर्मचाऱ्यांवरील हे हल्ले चिंताजनक असल्याचे भारताने म्हटले होते. आंतरराष्ट्रीय जलमार्गातील हल्ले जागतिक वाणिज्य आणि संपूर्ण जगभरासाठी चिंतेचा विषय आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. रशिया-युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी चर्चेचा मार्ग अवलंबावा असे आवाहनही भारताने केले.





