Rohit Pawar : तो मफलरमॅन कोण? अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार थेट म्हणाले…
Rohit Pawar : आता रोहित पवार यांनी या प्रकरणासंदर्भात आणखी एक मोठा दावा केला आहे.

Rohit Pawar makes a major claim regarding the Ajit Pawar plane incident : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ अद्याप कायम असून, आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता.
या अपघातानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच त्यांनी व्हीएसआर कंपनी आणि तिच्या मालकावरही गंभीर आरोप केले होते.
आता रोहित पवार यांनी या प्रकरणासंदर्भात आणखी एक मोठा दावा केला आहे. एका कार्यक्रमात एका नेत्याने विशिष्ट मफलर घातल्याचा उल्लेख करत, “आतापर्यंत या नेत्यानेच व्हीएसआर कंपनीला वाचवले आहे.” असा मोठा दावा त्यांनी केला. रोहित पवार चाळीसगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी माध्यमांशी त्यांना संवाद साधला.
रोहित पवार म्हणाले “अजितदादांचा अपघात किंवा घातपात ज्या लोकांनी केला असावा, असे आम्हाला वाटते, अशा लोकांना जर कुणी वाचवत असेल, तर त्यांचे नावही आम्ही लपवणार नाही.” येत्या १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान संबंधित नेत्याचे नाव आणि त्यासंदर्भातील पुरावे जाहीर करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, पत्रकारांनी हा नेता केंद्रातील आहे की राज्यातील, असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला. त्यावर त्यांनी केंद्रातील नेता नसून राज्यातीलच नेता असल्याचे स्पष्ट केले. मात्र संबंधित नेत्याचे नाव त्यांनी जाहीर केलेले नाही. “१० तारखेला नाव आणि पुराव्यासकट सर्व माहिती सांगू,” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
त्यामुळे आता रोहित पवार १० ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत नेमके कोणते नाव जाहीर करणार, तसेच ते कोणते पुरावे समोर ठेवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या दाव्यांमुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.






