Who is Shaina NC? : बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याने वाद, नंतर मागितली माफी; शायना एनसी आहे तरी कोण?
Who is Shaina NC? : या पत्रकार परिषदेदरम्यान शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्या हातून चुकून शिवसेनाप्रमुख दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला.

Who is Shaina NC? : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ पुस्तक चर्चेत असून, यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांवर आक्षेप घेतला जात आहे. पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतच्या उल्लेखांवर आक्षेप घेत शिंदेसेनेच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
या पत्रकार परिषदेदरम्यान शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्या हातून चुकून शिवसेनाप्रमुख दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला. या घटनेनंतर नवा वाद निर्माण झाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह अनेक राजकीय नेत्यांनी शायना एनसी यांच्यावर टीकेची झोड उठवली. (Who is Shaina NC?)
वाढता वाद लक्षात घेता शायना यांनी आधी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आणि त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर माफी मागितली. या घटनेमुळे चर्चेत आलेल्या शायना एनसी नेमक्या कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे, याबाबत जाणून घेऊया.
कोण आहेत शायना एनसी? (Who is Shaina NC?)
शायना एन.सी. यांचे पूर्ण नाव शायना नाना चुडासमा असे आहे. त्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९७२ रोजी मुंबईत झाला. त्या मुंबईचे माजी शेरीफ आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नाना चुडासमा यांच्या कन्या आहेत.
शायना यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून राज्यशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले. फॅशन क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
साडी नेसण्याच्या कौशल्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव (Who is Shaina NC?)
शायना एनसी यांना फॅशन विश्वात ‘क्वीन ऑफ ड्रेप्स’ म्हणून ओळखले जाते. साडी नेसण्याच्या त्यांच्या अनोख्या कौशल्यामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्या तब्बल ५४ वेगवेगळ्या पद्धतींनी साडी नेसू शकतात. सर्वात कमी वेळेत साडी नेसण्याच्या विक्रमाचीही त्यांच्या नावावर नोंद असल्याचे सांगितले जाते. याच कौशल्यामुळे त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले.
२००४ मध्ये राजकीय प्रवासाला सुरुवात (Who is Shaina NC?)
शायना एनसी यांनी २००४ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. भाजपमध्ये त्यांनी राष्ट्रीय प्रवक्त्या, महाराष्ट्र भाजपच्या खजिनदार आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. जवळपास दोन दशके भाजपमध्ये काम केल्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेकडून त्यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांनी त्यांचा पराभव केला.
राज्यसभेसाठीही झाली होती नावाची चर्चा (Who is Shaina NC?)
त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये शायना एनसी यांची शिंदे गटाच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्यसभेच्या उमेदवारीसाठीही त्यांच्या नावाची चर्चा रंगली होती. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या नावाबाबत उत्सुकता होती. मात्र, पक्षाने ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी दिली.
पोस्टमध्ये काय म्हणाल्या शायना एनसी? (Who is Shaina NC?)
शायना एनसी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते.”





