Dadar Railway station: दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार? मनसे नेत्याने म्हंटले “बाहेरच्या लोकांनी केलेली मागणी आमच्यावर थोपवू नका”
Dadar Railway station: नामकरणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता

Dadar Railway station: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
मात्र या नामकरणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी एक्सवर पोस्ट करत, या निर्णयाबाबत दादरकरांना विचारात घेतलं नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
एक्स पोस्टमध्ये किल्लेदार यांनी म्हटलं की, “दादरचं नाव बदलताना दादरकरांचं मत विचारात घेतलं गेलं नाही. बाहेरच्या लोकांनी केलेल्या मागणीला दादरकरांवर थोपवत दादरकरांची ओळख पुसण्याचं काम सुरू आहे”, असं म्हणत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ७०वा महापरिनिर्वाण दिन
दरम्यान, यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ७०वा महापरिनिर्वाण दिन असून, ५ व ६ डिसेंबरला आहे. ‘महापरिनिर्वाण दिनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येतात. दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मागील वर्षांच्या अनुभवातून निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे’, अशा सूचनाही फडणविसांनी दिल्या.
‘अनुयायांना त्रास होऊ नये, यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे अथवा आंदोलनांना अधिकृतपणे बंदी जाहीर करण्याबाबत गृहविभागाने कार्यवाही करावी’, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच् इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा:





