Kal Somani : घरात टीव्ही नव्हता, आज १५ हजार कोटींचा संघ विकत घेतला! वाशीमच्या कैलास सोमाणींची आयपीएलमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री
Kal Somani : कैलास (कल) सोमाणी हे मूळचे वाशीमचे सुपुत्र असून, त्यांचा हा प्रवास शून्यातून विश्व निर्माण करणारा आहे.

Kal Somani Rajasthan Royals Owner : आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्स (RR) या संघाची मालकी एका मराठी माणसाकडे आल्याने संपूर्ण विदर्भात आनंदाचे वातावरण आहे. १५ हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करून हा संघ विकत घेणारे कैलास (कल) सोमाणी हे मूळचे वाशीमचे सुपुत्र असून, त्यांचा हा प्रवास शून्यातून विश्व निर्माण करणारा आहे.
आयपीएलमधील पहिला चषक जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाची मालकी आता एका अस्सल मराठी उद्योजकाकडे आली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक कल सोमाणी यांनी तब्बल १.६३ अब्ज डॉलर्स (सुमारे १५,२८६ कोटी रुपये) मोजून हा संघ विकत घेतला आहे. या व्यवहारामुळे जागतिक क्रीडा विश्वात खळबळ उडाली असून, वाशीमच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाने मारलेली ही झेप नव्या पिढीसाठी मोठी प्रेरणा ठरत आहे.
वाशीम ते अमेरिका: संघर्षाचा प्रवास
🚨 Breaking News: US-based entrepreneur Kal Somani-led consortium has bought 100% of Rajasthan Royals at $1.63 billion. pic.twitter.com/hag37zED0a
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) March 24, 2026
१५ ऑगस्ट १९७४ रोजी वाशीममध्ये जन्मलेल्या कैलास सोमाणी यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली. घरात टीव्हीदेखील नसलेल्या स्थितीत त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. वाशीमच्या मुलीबाई चरखा विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतल्यावर, त्यांनी शेगावच्या संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला ते अमेरिकेत स्थायिक झाले आणि तिथे तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील नाव –
अमेरिकेत ‘कल सोमाणी’ या नावाने परिचित झालेल्या कैलास यांनी डेटा गोपनीयता, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि एडटेक क्षेत्रात मोठे यश संपादन केले. त्यांच्या कंपन्यांमध्ये अमेरिकेत १२०० तर पुण्यात ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. व्यवसायासोबतच त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. आपल्या मातीशी असलेली नाळ जपण्यासाठी त्यांनी अकोला-नागपूर महामार्गावर तळेगाव येथे क्रिकेट अकादमी स्थापन केली असून, गरीब खेळाडूंसाठी १ कोटी रुपयांची मदतही दिली आहे.
विदर्भाची शान –
कल सोमाणी यांचे कुटुंब आजही विदर्भात वास्तव्यास आहे. त्यांची बहीण डॉ. रश्मी बजाज अकोल्यात राहतात. आपला मुलगा अर्जुन आणि मुलगी सानिया यांच्यासह अमेरिकेत राहणारे कल सोमाणी आता राजस्थान रॉयल्सच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. वाशीमच्या जवाहर कॉलनीतील एका घरातून सुरू झालेला हा प्रवास आता थेट आयपीएलच्या मालकी हक्कापर्यंत पोहोचला आहे.





