Ips Tejaswi Satpute : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असून, या प्रकरणाची दिशा आता पूर्णपणे बदलताना दिसत आहे. आरोपीवरचा कायदेशीर दबाव वाढत चालला असून, येत्या काळात त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक पोलिसांनी बुधवारी रात्री अशोक खरातला अटक केली. ३५ वर्षीय महिलेवरील बलात्काराच्या आरोपांनंतर सुरू झालेल्या तपासात पोलिसांना मोठे पुरावे हाती लागले आहेत. प्राथमिक तपासात खरातकडून जप्त करण्यात आलेल्या पेनड्राइव्हमध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. या व्हिडिओंमध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग आणि धक्कादायक बाबी समोर आल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या SITचे नेतृत्व २०१२ बॅचच्या अनुभवी IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तेजस्वी सातपुते यांनी तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच कारवाईचा वेग वाढवला आहे. त्यांनी गुरुवारी अशोक खरातची दोन ते तीन तास सखोल चौकशी केली, तसेच जप्त केलेल्या पेनड्राइव्हमधील व्हिडिओंची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. त्यांच्या कडक आणि निर्भीड कामकाजाच्या शैलीमुळे पोलीस दलात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कोण आहेत डॅशिंग IPS अधिकारी तेजस्वी सातपुते? Ips Tejaswi Satpute तेजस्वी सातपुते यांची ओळख महाराष्ट्राला एक दबंग पोलीस अधिकारी आणि कार्यक्षम महिला पोलीस अधिकारी म्हणून आहे. तेजस्वी सातपुते या कठोर कार्यपद्धती आणि संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासासाठी प्रसिद्ध आहेत. तेजस्वी सातपुते या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील रहिवासी असून त्यांना अत्यंत अनुभवी अधिकारी मानल्या जातात. त्यांनी यापूर्वी सातारा आणि सोलापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच पुणे वाहतूक शाखेत पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय एसआरपीएफच्या समादेशकपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. Ips Tejaswi Satpute : भोंदूबाबा खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या IPS तेजस्वी सातपुते कोण? फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणासारख्या संवेदनशील तपासांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच अशोक खरात प्रकरणाचा तपास त्यांच्या नेतृत्वाखाली योग्य दिशेने आणि वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या सुरू असलेल्या तपासामुळे या प्रकरणातील अनेक गुपिते उघड होण्याची शक्यता असून, लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.