Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा पाय आणखी खोलात; ‘या’ ठिकाणी तिसरा गुन्हा दाखल
नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात (Ashok Kharat Case) यांच्या काळ्या कारनाम्यांचा साखळीप्रमाणे पर्दाफाश होत आहे.

Ashok Kharat Case : नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात (Ashok Kharat Case) यांच्या काळ्या कारनाम्यांचा साखळीप्रमाणे पर्दाफाश होत आहे.
महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आधीच अटकेत असलेल्या खरातविरुद्ध आता तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, अशोक खरातने (Ashok Kharat Case) तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही महिला सुरुवातीला लग्नापूर्वी त्याच्याकडे जात होती. नंतर तिचा विवाह झाल्यानंतर संसारातील वादांमुळे ती खरातकडे ‘दोष निवारण’ आणि मार्गदर्शनासाठी जात असे. खरातने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक शोषण सुरू केले. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले, ज्यामुळे पीडिता गर्भवती राहिली.
गर्भवती असतानाही शोषण सुरूच
खरातने आपले पितळ उघडे पडू नये म्हणून गर्भवती पीडितेला गर्भपात करण्यासाठी औषध दिले होते. त्याने तिला २०२७ पर्यंत लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. तो स्वतःला अवतारी पुरुष म्हणवत असे आणि पीडितेला “तू मागील जन्माची अप्सरा आहेस, मला त्रिकाळ ज्ञान आहे, तुझा घटस्फोट लिखित आहे” असे सांगून विश्वासात घेत असे. “माझ्या नशिबात दोन विवाह आहेत, तू माझ्याशी लग्न कर, मी तुला आणि तुझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेन” अशी आश्वासनेही दिली होती.
पोलिसांची कठोर कारवाई
या प्रकरणात अशोक खरातला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून, नाशिक पोलिसांनी त्याला कठोर चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, खरातच्या फॉर्महाऊस, कार्यालय आणि मालमत्तेवर छापेमारी सुरू आहे. यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्येही ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त झाले आहेत.
राजकीय आणि सामाजिक खळबळ
खरातच्या (Ashok Kharat Case) प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांचा तपास अधिक गहन होत असून, आणखी पीडित महिला समोर येण्याची शक्यता आहे. अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात अंधश्रद्धेने अडकलेल्या महिलांना न्याय मिळावा, यासाठी नाशिक पोलिसांची कारवाई राज्यभरात चर्चेत आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धा, जादूटोणा आणि महिलांच्या शोषणाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.






