नागपूर : फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या तळहातावरती लिहीलेले हस्ताक्षर तिचेच असल्याचे पडताळण्यात आले आहे. ज्या पोलिस आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरची नावे त्यात नमूद करण्यात आली आहेत, ते तिला छळण्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री भाजप आमदार अमित साटम यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत होते. ऑक्टोबरमध्ये फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये सरकारी रुग्णालयातील डॉक्टर मृतावस्थेत आढळली होती. तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने आरोप केला होता की, पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदाणे यांनी तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला, तर सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकर यांनी तिचा मानसिक छळ केला. चिठ्ठीतील हस्ताक्षर आणि त्यात ज्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत ते तिच्या मृत्यूत सहभागी आहेत का असा सवाल साटम यांनी केला. डॉक्टरने तिच्या हातावर एक नोट लिहिली होती आणि त्यात दोन नावे नमूद केली होती. तपासात आढळून आले आहे की हस्ताक्षर तिच्याशी जुळते. तपासात दिसून आले की, पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदाणे यांनी लग्नाचे आश्वासन देऊन तिचे लैंगिक शोषण केले. दुसऱ्या आरोपीने (बनकर) देखील तिची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. तथापि, यामध्ये इतर कोणी सहभागी आहे का याची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. एक महिला आयपीएस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत असल्याचेही फडणवीस म्हणाले. या प्रकरणाचा राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वासन दिले की महिलांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे आणि सरकार त्यासाठी वचनबद्ध आहे.