Gurnoor Brar Debut : कोण आहे गुरनूर ब्रार? अफगाणिस्तानविरुद्ध पदार्पण करताना पहिल्याच ओव्हरमध्ये घेतली विकेट
Gurnoor Brar Debut : भारतासाठी पदार्पण करणाऱ्या गुरनूर ब्रारने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय षटकात विकेट घेत स्वप्नवत सुरुवात केली.

Gurnoor Brar Dream Debut IND vs AFG 1st ODI : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार आज, १३ जून रोजी धरमशाला येथील अत्यंत देखण्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू झाला आहे. या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हवामान खात्याच्या ९० टक्के पावसाच्या अंदाजानंतरही सामना सुरू झाला. भारतासाठी पदार्पण करणाऱ्या गुरनूर ब्रारने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय षटकात विकेट घेत स्वप्नवत सुरुवात केली.
पहिल्याच ओव्हरमध्ये धमाका; झाद्रानला दाखवला तंबूचा रस्ता!
उंचपुऱ्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पदार्पण एखाद्या सोनेरी स्वप्नासारखे ठरले आहे. भारतीय डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी कर्णधार गिलने चेंडू पदार्पण करणाऱ्या गुरनूरच्या हाती सोपवला. या षटकातील पाचव्या चेंडूवर गुरनूरने एक भेदक ‘शॉर्ट पिच’ चेंडू टाकला. यावर अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झाद्रानने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू हवेत उडाला आणि मिड-ऑफवर उभ्या असलेल्या कर्णधार शुबमन गिलने कोणतीही चूक न करता एक उत्कृष्ट झेल टिपला. यासह अफगाणिस्तानला पहिला मोठा धक्का बसला.
कोण आहे गुरनूर ब्रार?
The stuff dreams are made of 🌟
🎥 Gurnoor Brar strikes in his very first over in international cricket ☝️
Updates ▶️ https://t.co/lCuohEZYAl #TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/x7qIkDWPZr
— BCCI (@BCCI) June 13, 2026
पंजाबमध्ये जन्मलेल्या गुरनूर ब्रारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये हळूहळू पण सातत्याने प्रगती केली आहे. आज, तो देशातील सर्वात आश्वासक आणि उदयोन्मुख वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. या उंच, उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाकडे उत्कृष्ट वेग, चेंडूला अतिरिक्त उसळी देण्याची क्षमता आणि चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता आहे. गेल्या दोन हंगामांपासून, तो लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पंजाब संघाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे. त्याचे वडील, सुखबीर सिंग ब्रार, पंजाब पोलिसात एएसआय आहेत.
फक्त एकच खेळलाय आयपीएल सामना –
सध्या असे दिसून येते की आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना निवडीमध्ये प्राधान्य दिले जाते. मात्र, गुरनूर बराडाच्या बाबतीत असे नाही. तो २०२३ मध्ये फक्त एकच आयपीएल सामना खेळला. त्याने पंजाब किंग्ससाठी तीन षटकांच्या स्पेलमध्ये ४२ धावा दिल्या होता. या वेगवान गोलंदाजाची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी प्रभावी आहे. त्याने १८ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये ५२ विकेट्स मिळवल्या आहेत, तसेच लिस्ट ए आणि टी-२० सामन्यांमध्ये अनुक्रमे १२ आणि १० विकेट्स घेतल्या आहेत. आता, आंतरराष्ट्रीय पदार्पणातच आपल्या पहिल्याच षटकात विकेट्स घेतल्यानंतर, तो एका उज्ज्वल कारकिर्दीची अपेक्षा करू शकतो.





