Suryakumar Support Abhishek : “तुझ्यामुळे देश हसलाय, स्वतःवर विश्वास ठेव!”; अभिषेकच्या भावुक पोस्टवरील सूर्याच्या कमेंट्सनी जिंकली सर्वांची मनं
Suryakumar Support Abhishek : अभिषेकची ही दुःखी पोस्ट पाहून भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला धीर आला असून त्याने दिलेला सल्ला सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Suryakumar Yadav Comment on Abhishek Sharma Emotional Insta Post : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळवूनही भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माचा (Abhishek Sharma) खराब फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत त्याला अवघ्या ११ धावा करता आल्या. सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे निराश झालेल्या अभिषेकने सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त केली. अभिषेकची ही दुःखी पोस्ट पाहून भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने त्याला धीर आला असून त्याने दिलेला सल्ला सध्या तुफान व्हायरल होत आहे.
खराब फॉर्मनंतर अभिषेक शर्माची भावुक पोस्ट –
COMEBACK STRONGER, ABHISHEK SHARMA 🤞🇮🇳
– Instagram post by Abhishek after a poor series with bat in Zimbabwe. pic.twitter.com/hN8iTj4SNR
— Johns. (@CricCrazyJohns) July 27, 2026
झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेनंतर अभिषेक शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले, “जेव्हा तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या अपेक्षांवर तुम्ही खरे उतरू शकत नाही, तेव्हा खूप त्रास होतो. पण क्रिकेट नेहमी अशा खेळाडूंना पुन्हा संधी देते, जे सातत्याने मेहनत करतात. संघाने मालिका जिंकली याचा आनंद आहे. मी आधीपेक्षा अधिक मजबूत होऊन पुनरागमन करेन.”
“तुझ्यामुळे देश हसलाय -” – सूर्याचा पाठिंबा
Suryakumar Yadav supporting Abhishek Sharma in his tough phase ❤️ pic.twitter.com/xM3PI5075P
— Johns. (@CricCrazyJohns) July 27, 2026
अभिषेकच्या मनातील वेदना ओळखून सूर्यकुमार यादवने कमेंट बॉक्समध्ये त्याला धीर देताना लिहिले, “गेल्या दोन वर्षांत तू देशवासीयांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची अनेक कारणे दिली आहेत. जेव्हा भारताला तुझी सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तू टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये अप्रतिम कामगिरी केलीस. हा फक्त एका टप्प्याचा विषय आहे. स्वतःवर विश्वास ठेव आणि नेहमीप्रमाणे निडर होऊन खेळत राहा.” सूर्याच्या या कमेंटनंतर चाहत्यांनी त्याच्या नेतृत्वगुणांचे जोरदार कौतुक केले आहे.
हेही वाचा – Esha Singh Gold : शूटिंग वर्ल्डकपमध्ये भारताचा डबल धमाका! ईशा सिंगने सुवर्णपदकावर अन् मनू भाकरने कांस्यपदकावर कोरलं नाव
शेवटच्या १० सामन्यांत ५ वेळा फ्लॉप!
अभिषेक शर्माचा फॉर्म गेल्या काही सामन्यांपासून अत्यंत खालावला आहे. आयरलंडविरुद्ध ४९ आणि ०, इंग्लंडविरुद्ध अनुक्रमे ५९, ४३, १०, १६ व ३ धावा आणि आता झिम्बाब्वेविरुद्ध १, ८ व २ धावा अशा निराशाजनक खेळी त्याने खेळल्या आहेत. म्हणजेच शेवटच्या १० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी ५ सामन्यांत तो दुहेरी धावसंख्याही गाठू शकलेला नाही.





