Acharya Devvrat : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत कोण? जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Acharya Devvrat : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवला असून, ते भारताचे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला.
राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली. यानंतर आता सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे, ते उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
अखेर गुजरातच्या राज्यपालाकंडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. ‘आचार्य देवव्रत’ हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. आचार्य देवव्रत आपल्या सध्याच्या जबाबदाऱ्यांसह महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचे कर्तव्यही पार पाडतील. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू होईल.
राष्ट्रपती कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे, “सी.पी. राधाकृष्णन यांनी भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्याने, राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदाच्या कर्तव्य सांभाळण्यासाठी नियुक्ती केली आहे, जी ते त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त पार पाडतील.”
कोण आहेत आचार्य देवव्रत?
हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा तहसीलमध्ये जन्मलेले आचार्य देवव्रत हे एक प्रमुख भारतीय राजकारणी असून ते २०२१ पासून गुजरातचे २० वे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. याआधी ते २०१५ ते २०१९ पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. आता ११ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे. त्यांनी हिंदी आणि इतिहासात पदव्युत्तर पदवी, शिक्षणात पदवी, योग विज्ञानात डिप्लोमा आणि निसर्गोपचार तसेच योगिक विज्ञानात डॉक्टरेट मिळवली आहे. ते नैसर्गिक शेती आणि गोवंश सुधारणेच्या क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांनी १८० एकरांवर नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
आचार्य देवव्रत हे भारतीय जनता पक्षाशी संलग्न आहेत आणि वैदिक मूल्ये, भारतीय संस्कृती आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे योगदान आहे. त्यांच्या पत्नीचे नाव दर्शना देवी आहे.





