आचार्य देवव्रत यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ; आता गुजरातच्या राज्यपालाकंडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी

Acharya Devvrat | महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा आज सोमवारी (१५ सप्टें) राजभवनात पार पडला. राज्याचे मावळते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड करण्यात आल्याने राज्याच्या राज्यपालपदाची सूत्रे सध्या गुजरातचे राज्यपाल आचर्य देवव्रत यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
दरम्यान, रविवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आचार्य देवव्रत यांनी आज सकाळी ११ वाजता राजभवनमधील दरबार हॉल येथे शपथ घेतली. त्यानुसार आचार्य देवव्रत यांनी आजपासून आपल्या राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारला. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोण आहेत आचार्य देवव्रत?
हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा तहसीलमध्ये जन्मलेले आचार्य देवव्रत हे एक प्रमुख भारतीय राजकारणी असून ते २०२१ पासून गुजरातचे २० वे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. याआधी ते २०१५ ते २०१९ पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. आता ११ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे. त्यांनी हिंदी आणि इतिहासात पदव्युत्तर पदवी, शिक्षणात पदवी, योग विज्ञानात डिप्लोमा आणि निसर्गोपचार तसेच योगिक विज्ञानात डॉक्टरेट मिळवली आहे. ते नैसर्गिक शेती आणि गोवंश सुधारणेच्या क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत.
त्यांनी १८० एकरांवर नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.आचार्य देवव्रत हे भारतीय जनता पक्षाशी संलग्न आहेत आणि वैदिक मूल्ये, भारतीय संस्कृती आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे योगदान आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. भारताच्या उपराष्ट्रपती पदी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. सी.पी राधाकृष्णन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
हेही वाचा:
पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरुप; वाहतूक विभागाकडून नागरिकांना महत्त्वाचे आवाहन





