Acharya Devvrat | Governor | C. P. Radhakrishnan : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपति निवडणुकीत विजय मिळवला असून, ते भारताचे नवे उपराष्ट्रपति बनले आहेत. त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली. यानंतर आता सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे, ते उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल पदकोणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे. अखेर गुजरातच्या राज्यपालाकंडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. ‘आचार्य देवव्रत’ हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. आचार्य देवव्रत आपल्या सध्याच्या जबाबदाऱ्यांसह महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचे कर्तव्यही पार पाडतील. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू होईल. राष्ट्रपती कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे, “सी.पी. राधाकृष्णन यांनी भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्याने, राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदाच्या कर्तव्य सांभाळण्यासाठी नियुक्ती केली आहे, जी ते त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त पार पाडतील.” हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील समालखा तहसीलमध्ये जन्मलेले आचार्य देवव्रत हे एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत. ते 2019 पासून गुजरातचे 20वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी, ते 2015 ते 2019 या कालावधीत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.