Rajya Sabha : सणांमुळे राज्यसभेच्या कामकाजाच्या वेळेत बदल; आता ‘या’ दिवशी कामकाज सुरू राहणार
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या (Rajya Sabha) कामकाजात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. १९ आणि २० मार्च २०२६ रोजी विविध सणांमुळे सभागृहाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Rajya Sabha : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या (Rajya Sabha) कामकाजात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. १९ आणि २० मार्च २०२६ रोजी विविध सणांमुळे सभागृहाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची भरपाई करण्यासाठी २८ आणि २९ मार्च या शनिवार-रविवारी कामकाज (Rajya Sabha) सुरू ठेवले जाईल, अशी माहिती राज्यसभेची सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी दिली.
गेल्या आठवड्यात बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी सुट्टीची विनंती केली होती.
१९ मार्चपासून नवरात्री, गुढीपाडवा आणि रमजान यांसारखे महत्त्वाचे सण सुरू होत असल्याने, सदस्यांना आपल्या मतदारसंघात उपस्थित राहता यावे, हा त्यामागचा उद्देश होता. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने ही विनंती मान्य केली आहे.
त्यानुसार १९ मार्च (गुरुवार) आणि २० मार्च (शुक्रवार) रोजी नियोजित असलेले कामकाज रद्द करण्यात आले आहे. महत्त्वाची विधेयके आणि चर्चा पूर्ण करण्यासाठी, सभागृह (Rajya Sabha) २८ मार्च (शनिवार) आणि २९ मार्च (रविवार) रोजी पूर्णवेळ कार्यरत राहील. सभापतींनी सर्व सदस्यांना या नवीन वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सणांचा आनंद घेतानाच संसदीय जबाबदाऱ्याही पार पाडता येतील.






