Pune District : साखरेच्या दरवाढीचे गौडबंगाल काय?
Pune District : या दरवाढीमागे साठेबाजी, काळाबाजार किंवा अन्य कोणते आर्थिक गौडबंगाल आहे का, असा सवाल करत या संपूर्ण व्यवहारात तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होण्याची शक्यता शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

बारामती : देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात अवघ्या आठवडाभरात तब्बल 20 रुपये प्रतिकिलोची वाढ झाल्याने साखर दरवाढीभोवतीचे गूढ अधिक गडद झाले आहे. मुबलक साखरेचा साठा उपलब्ध असतानाही बाजारभाव अचानक गगनाला भिडत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्र सरकारच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या दरवाढीमागे साठेबाजी, काळाबाजार किंवा अन्य कोणते आर्थिक गौडबंगाल आहे का, असा सवाल करत या संपूर्ण व्यवहारात तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होण्याची शक्यता शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
देशाचा वार्षिक साखर वापर सुमारे 280 लाख टन असल्याचे नमूद करत, पुढील दोन वर्षांसाठी आवश्यकतेपेक्षा अधिक साखरेची उपलब्धता असतानाही दर एवढ्या वेगाने का वाढत आहेत, असा थेट सवाल शेट्टी यांनी केंद्र सरकारला केला आहे. “साखर कुठे गायब झाली?” असा संतप्त प्रश्न उपस्थित करत त्यांनी साखर कारखानदार, साठेबाज आणि व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
उत्पादन मुबलक, मग दरवाढ कशासाठी?
शेट्टी यांनी आपल्या पत्रात देशातील साखरेच्या उपलब्धतेचा तपशील मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2024-25 मध्ये देशात सुमारे 260 लाख टन, तर 2025-26 मध्ये सुमारे 290 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. याशिवाय मागील हंगामातील सुमारे 50 लाख टनांचा प्रारंभिक साठा धरला, तर देशाकडे मोठ्या प्रमाणात साखरेची उपलब्धता आहे. असे असतानाही बाजारातील दर अचानक वाढण्यामागे नेमके कोणते कारण आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
22 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात शेट्टी यांनी साखरेच्या दरवाढीचा थेट हिशेब मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट 2025 मध्ये साखरेचा दर सुमारे 3,700 रुपये प्रतिक्विंटल होता. यंदाच्या ऑगस्टमध्ये तो थेट 6,700 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या वर्षभरात साखरेच्या दरात तब्बल 3 हजार रुपये प्रतिक्विंटलची वाढ झाली असून, अलीकडील काळात प्रतिकिलो सुमारे 20 रुपयांची अचानक वाढ झाली आहे.
साखरेच्या अचानक झालेल्या दरवाढीमागे मोठ्या प्रमाणात साठेबाजी आणि काळाबाजार असल्याचा संशय व्यक्त करत शेट्टी यांनी या संपूर्ण प्रकरणात सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मागील सहा महिन्यांतील साखरेचा साठा, विक्रीचे व्यवहार तसेच साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
साखरेच्या बाजारभावात एवढी मोठी वाढ होत असताना त्याचा प्रत्यक्ष फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कितपत मिळत आहे, हा शेट्टी यांनी उपस्थित केलेला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या साखरेच्या दराचा विचार करता ऊस उत्पादकांना प्रतिटन सुमारे 5,500 रुपये दर मिळायला हवा, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच मागील वर्षी पुरवलेल्या उसासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त 1,000 रुपये प्रतिटन देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
एकीकडे बाजारात साखरेचे दर गगनाला भिडत आहेत, तर दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी, थकीत रक्कम आणि अतिरिक्त दराचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे साखरेच्या वाढलेल्या बाजारभावाचा खरा फायदा नेमका कोणाच्या खिशात जात आहे, याची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
कच्च्या साखरेच्या आयातीवरही शेट्टी आक्रमक
दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिल्याच्या निर्णयावरही शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशात आधीच पुरेसा साखरेचा साठा उपलब्ध असताना आयातीची गरज काय, असा सवाल त्यांनी केला आहे. आयात केलेली साखर बाजारात आल्यानंतर पुढील हंगामात साखरेचे दर कोसळण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
‘दरवाढीचा तपास करा, शेतकऱ्यांना वाचवा’
देशात साखरेचा साठा मुबलक असतानाही बाजारभाव दुप्पट होण्याच्या दिशेने जात असतील, तर या दरवाढीचा फायदा कोण घेत आहे, याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. साखरेच्या दरातील अचानक झालेली वाढ असामान्य आणि संशयास्पद असल्याचे शेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून साखरेचे दर स्थिर करावेत, मागील सहा महिन्यांतील साखरेचा साठा, विक्री आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी ठाम मागणी शेट्टी यांनी केली आहे. “साखर कुठे गायब झाली आणि दरवाढीचा पैसा कुणाच्या खिशात जातोय?” या प्रश्नाचे उत्तर आता केंद्र सरकारने देशातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसमोर स्पष्टपणे ठेवावे, अशी मागणी शेट्टी यांच्या पत्रामुळे पुढे आली आहे.





