Pune District : ‘छात्रों की गुंज’ ला पुरंदर तालुक्यातून प्रतिसाद
Pune District : पुरंदरमधून ३०० हून अधिक विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याचे पुरंदर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी जगताप यांनी सांगितले.

सासवड : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी विद्यार्थ्यांना थेट संवाद साधता यावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला पुरंदर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुरंदरमधून ३०० हून अधिक विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याचे पुरंदर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी जगताप यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमात सहभाग घेतला. राहुल गांधी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याने विद्यार्थी- विद्यार्थिनीत मोठा उत्साह निर्माण झाला होता.
विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना थेट राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाकडून उत्तरे मिळणार असल्याने या कार्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता होती. शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, युवकांचे प्रश्न तसेच देशाच्या भविष्यासंदर्भातील विषयांवर संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
पुरंदर तालुक्यातून नियोजन पुरंदर काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यासाठी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार, ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे, सचिन दुर्गाडे, किरण कवठेकर, साहेबराव फडतरे, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





