Pune District : श्री कपर्दिकेश्वरचरणी लाखो भाविक
Pune District :आरती व पूजाविधी देवस्थानचे अध्यक्ष अनिल तांबे, गांधी पानसरे, सचिन तांबे, जितेंद्र डुंबरे, सागर दाते, धनंजय पाटील डुंबरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

ओतूर : श्रीक्षेत्र ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री कपर्दिकेश्वर मंदिरात दुसर्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवलिंगावर कोरड्या तांदळापासून साकारण्यात आलेल्या दोन कलात्मक पिंडींचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभर पाऊस नसल्याने भाविकांचा उत्साह अधिकच वाढला.
दुसर्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर सकाळी सहा वाजता भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. शिवलिंगावर साकारलेल्या तांदळाच्या दोन पिंडींचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून आलेल्या भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. आरती व पूजाविधी देवस्थानचे अध्यक्ष अनिल तांबे, गांधी पानसरे, सचिन तांबे, जितेंद्र डुंबरे, सागर दाते, धनंजय पाटील डुंबरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
आरतीचे मानकरी म्हणून श्री व सौ. स्वप्निल नलावडे, श्री व सौ. संजय अनंथा बुगदे, श्री व सौ. अॅड. गौरव नरेंद्र पाटील डुंबरे आणि श्री व सौ. शंकरराव शेरकर यांनी मानाची सेवा बजावली. पुजारी गोविंदकाका डुंबरे यांनी पूजाविधी पार पाडला. यात्रेनिमित्त प्रसादिक भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यासह इतर तालुक्यांतील एकूण 23 भजन मंडळांनी सहभाग घेतला. सुश्राव्य भजनांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला. ग्रामस्थांसह आलेल्या भाविकांनीही भजन स्पर्धेचा आनंद घेतला. देवस्थानचे अध्यक्ष अनिल तांबे व सचिव महेंद्र पानसरे यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
श्री कपर्दिकेश्वर देवस्थानला ऐतिहासिक महत्त्व असून, येथे दरवर्षी श्रावणी सोमवारनिमित्त मोठ्या संख्येने भाविक येतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सद्गुरू श्री चैतन्य महाराज यांची संजीवन समाधीही ओतूर येथे असल्याने भाविकांनी या समाधीचे दर्शन घेतले. यात्रेसाठी आलेल्या भाविकांना ‘स्विमिंग अँड वॉकिंग ग्रुप’च्या वतीने केळीचे वाटप करण्यात आले. भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक तैनात करण्यात आले होते. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तसेच पोलीस नागरिक मित्र संघटनेचे स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दुसर्या श्रावणी सोमवारची यात्रा उत्साहात व शांततेत पार पडली.





