Pune District : रोगराईने पुरंदरचे सीताफळ डागळले
Pune District : मागील दोन ते तीन वर्षांपासून पावसाची अनियमिततेमुळे फळ धारणा योग्य झाली नाही. त्यामुळे यावर्षीही कमी फळे लागली आहेत.

वाल्हे : पुरंदर तालुक्यात सीताफळ हे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे आर्थिक उत्पादनाचे साधन आहे. मात्र, सद्यःस्थितीतील हा हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने तोट्याचा हंगाम ठरत असून सीताफळ पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सीताफळांवर पांढऱ्या- काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. ‘फ्रूट रॉट’ आणि ‘ब्लॅक कॅन्कर’ या बुरशीजन्य रोगामुळे सीताफळ पीक धोक्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील सीताफळ हे देशभरात सर्वत्र प्रसिद्ध आहे. तालुक्यातील सीताफळ पावसाळी बहार सध्या चालू आहे. मात्र, फळ धारणेच्यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या चुकांमुळे सीताफळ पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. अयोग्य पद्धतीने छाटणी व जुनी रोगट फळे काढण्याकडे शेतकऱ्यांनी केलेले दुर्लक्ष,यामुळे फळांवर काळे डाग पडले आहेत. पुरंदर तालुक्यात ४३९७ हजार एकर सीताफळ क्षेत्र आहे. यामध्ये एकरी १६० झाडे असून ७ लाखांहून अधिक सीताफळाची झाडे असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी दिली.
पुरंदर तालुक्यात चांगल्या प्रतीच्या सीताफळांच्या २० किलो कॉरेटला १००० ते १२०० रूपयांपर्यंत बाजारभाव मिळत असून,बुरशीजन्य फळांना प्रती कॅरेट साधारणतः२०० ते २५० रुपये असा अत्यल्प बाजारभाव मिळत आहे. दरम्यान, सद्यःस्थितीतील वातावरणात या काळ्या बुरशीमुळे व पिठ्या ढेकून या रोगांमुळे सीताफळाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागांवर बुरशीनाशक व कीटकनाशक व बोर्डोमिश्रणाची फवारणी सुरू केली आहे.
सीताफळाच्या देठाजवळ काळे डाग पडण्याचे प्रमाण वाढले आहे. हवेतील आर्द्रता आणि रिमझिम पावसामुळे सीताफळाच्या देठाकडील भागात दव आणि पाणी साचून तेथे काळी, पांढरी बुरशी वाढत आहे. फळाच्या त्या भागातील पेशी मृत होतात. त्यामुळे काळे डाग पडण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली.
मागील दोन ते तीन वर्षांपासून पावसाची अनियमिततेमुळे फळ धारणा योग्य झाली नाही. त्यामुळे यावर्षीही कमी फळे लागली आहेत. यातच फळांवर होत असलेल्या बुरशीजन्य रोगांमुळे, सीताफळ उत्पादकांना औषध फवारणीचा खर्च वाढत असून आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा सीताफळ तोडणीचा हंगाम सुरू असून, अशा बुरशीजन्य रोगांमुळे फळांची गुणवत्ता घसरताना दिसत आहे.
बुरशीजन्य रोगांमुळे दरावर परिणाम
सद्यःस्थितीत बाजारामध्ये ३० टक्के काळ्या, पांढऱ्या बुरशीजन्य फळांची आवक होते. फक्त मोठ्या आकाराची काळी फळे ही कमी बाजार भावात खरेदी केली जातात. परंतु लहान आकाराच्या फळांना गोवा व गुजरात आणि इतर बाजारपेठेत कवडीमोलही किंमत मिळत नाही.अशी निराशाजनक प्रतिक्रिया सीताफळ व्यापारी गुणवंत राऊत यांनी दिली.
फळ धारणेच्यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या चुकांमुळे सीताफळ पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. अयोग्य पद्धतीने छाटणी व जुनी रोगट फळे काढण्याकडे शेतकऱ्यांनी केलेले दुर्लक्ष, आदी कारणामुळे फळांवर काळे डाग पडले आहेत. यातच सद्यःस्थितीतील वातावरणामुळे व बुरशीमुळे सीताफळाच्या उत्पादनात लक्षणीय घट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागांवर बुरशीनाशक व कीटकनाशक व बोर्डोमिश्रणाची फवारणीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे फळ उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.
-सागर भुजबळ, सीताफळ उत्पादक





