Supriya Sule : पुण्यासारख्या शांत शहराला नेमकं झालंय तरी काय? सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया; २४ तासांत दोन गोळीबाराच्या घटना
Supriya Sule : पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगाराच्या घटनांमुळे पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिलाय का असा संतप्त सवाल विचारला जात आहे. शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाहनांची तोडफोड, क्षल्लुक कारणावरून मारहाण, खून, चोरी अशा घटना सातत्याने घटत आहेत. अवघ्या २४ तासांत पुण्यात दोन गोळीबाराच्या घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यासारख्या शांत शहराला नेमकं झालंय तरी काय? अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवरून ट्वीट केलं आहे.
खडकवासला येथील कोल्हेवाडी चौकात काल रात्री गाडी घासण्याच्या कारणावरुन झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान गोळीबारात झाले. टोळक्यातील एकाने गावठी पिस्तुलातून तीन राऊंड फायर केले. हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसस्टॉप आहेत. सुदैवाने या गोळीबारात कुणाला मोठी इजा झाली नाही. पुण्यासारख्या शांत शहराला नेमकं झालंय तरी काय? अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
येथील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. ही अतिशय संतापजनक आणि तितकीच चिंताजनक बाब आहे. सर्वसामान्य जनता आज भीतीच्या छायेखाली जगत असून गुन्हेगारांना मात्र मोकळे रान मिळाले आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचे काम गृहखात्याने थांबविले आहे का असा संशय यावा इतपत ही गंभीर परिस्थिती असल्याचे सुळे म्हणाल्या आहेत. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी तातडीने ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट
खडकवासला येथील कोल्हेवाडी चौकात काल रात्री गाडी घासण्याच्या कारणावरुन झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान गोळीबारात झाले. टोळक्यातील एकाने गावठी पिस्तुलातून तीन राऊंड फायर केले. हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसस्टॉप आहेत. सुदैवाने या गोळीबारात कुणाला मोठी…
— Supriya Sule (@supriya_sule) August 5, 2025
दोन गोळीबारांच्या घटनांमुळे खळबळ
पुण्यातील कोल्हेवाडीत क्षुल्लक कारणावरून हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीला कट मारल्याच्या रागातून देशी बनावटीच्या पिस्तूलातून हवेत गोळीबार करण्यात आला. नांदेड सिटी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर दुसऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, या घटनेच्या आधी उत्तमनगर भागात बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यानं एक तरुण जखमी झाला होता. अवघ्या २४ तासात घडलेल्या या दोन गोळीबारीच्या घटनांमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : ब्राझीलचे माजी राष्ट्रपती ‘हाऊस अरेस्ट’ ; सत्तापालटाचा कट रचल्याच्या आरोपाखाली कारवाई





