weather update – पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, देशाच्या बहुतांश भागातून तो आता परतीच्या मार्गाला लागला आहे. पुणे वेधशाळेने अधिकृतपणे मान्सून परतीला लागल्याची घोषणा केली आहे. मान्सूनच्या परतीची सीमारेषा सोमवारी स्पष्ट झाली. नैऋत्य मौसमी पाऊस सोमवारी कर्नाटक तेलंगणाच्या काही भागातून, महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून, संपूर्ण गोवा राज्यातून, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशच्या उर्वरीत सर्व भागातून, छत्तीसगढच्या बहुतांश भागातून, बिहारच्या उर्वरीत भागातून, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम राज्यातील संपूर्ण भागातून तसेच ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागातून तो माघारी परतला आहे. पुढील दोन -तीन दिवसात उर्वरीत ओडिसा, छत्तीसगढ, तेलंगणा, महाराष्ट्र आणि ईशान्येकडील राज्यातून परतण्यासाठी वातावरण अनुकूल आहे, असे पुणे वेधशाळेने सांगितले आहे. महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज : पुढील दोन दिवस महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आणि त्यानंतरच्या दोन दिवसात काही ठिकाणी मान्सून नंतरचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १४ अॉक्टोबर रोजी सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ अॉक्टोबर रोजी पावसाची व्याप्ती राज्यात वाढण्याची शक्यता असून, उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्ये वगळता राज्यातील उर्वरीत सर्व जिल्ह्यात अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. १६ अॉक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि त्या लगतच्या उत्तर विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनची तीव्रता कमी होऊन १७ अॉक्टोबर रोजी पालघर आणि नाशिक जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. पुण्याचा हवामान अंदाज : पुणे आणि परिसरात १४ अॉक्टोबर रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहील. त्यानंतर दोन -तीन दिवस आकाश दुपारनंतर ढगाळ राहील. १८-१९ अॉक्टोबर दरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.