Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विकासकामे आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर पुढील दोन महिने भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

Trimbakeshwar Temple – ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरातून भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विकासकामे आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर पुढील दोन महिने भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
संभाव्य नियोजनानुसार येत्या 15 किंवा 16 ऑक्टोबरपासून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. हा निर्णय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार घेण्यात आला आहे.
मंदिर जरी भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार असले, तरी मंदिरातील पारंपरिक आणि धार्मिक परंपरा खंडित होणार नाहीत. श्री त्र्यंबकेश्वराची दररोज होणारी नित्यपूजा, त्रिकाल पूजा आणि धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
त्र्यंबकेश्वर मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. कुंभमेळ्याच्या कामांमुळे अपघात किंवा चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवू नये म्हणून गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थान ट्रस्टकडून मंदिर बंद करण्याबाबतच्या तारखांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे.
दरम्यान, सध्या पितृपक्षाच्या निमित्ताने देशभरातून हजारो भाविक त्र्यंबकेश्वर येथे पितृकर्म आणि धार्मिक विधींसाठी येत आहेत. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी देवस्थान ट्रस्टने 12 ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ केंद्र, राज्य शासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या राज्यशिष्टाचाराच्या पत्रांनाच यातून अपवाद ठेवण्यात आले आहे.





