मुंबई : मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी हातमिळवणी केली आहे. यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका करत “पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडला पराभवाला सामोरे जावे लागेल,” असा टोला लगावला. “लोकांचा विश्वास आणि गर्दी यांचा ब्रँड बंद होण्याच्या मार्गावर आहे. स्वदेशी माल चालेल,” असेही लाड म्हणाले. भ्रष्टाचारावर लाड यांचा हल्लाबोल लाड यांनी ठाकरे गट आणि मनसेवर टीकास्त्र सोडताना भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. “राज ठाकरे यांना या निवडणुकीबाबत काहीच माहिती नसेल, पण उद्धव ठाकरे ‘ब्रँड-ब्रँड’ करत आहेत. सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांनी मनसेला कवडीमोल समजले, आता उद्धव ठाकरे त्यांच्यापुढे हात पसरत आहेत,” अशी खोचक टीका लाड यांनी केली. “२५ वर्षे सत्ता उपभोगूनही त्यांनी काय साध्य केले? चार कोटींचे कार्यालय २४ कोटींना खरेदी केले. या भ्रष्टाचाराचा हिशोब त्यांना द्यावा लागेल,” असे लाड म्हणाले. पोलिसांनी याबाबत नोटीसही काढल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, “संजय राऊत यांना संधी मिळाली तर ते उद्धव ठाकरेंची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतही युती करतील,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. कामगारांचा सन्मान हाच ध्यास: प्रवीण दरेकर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही या निवडणुकीबाबत मत व्यक्त केले. “ही निवडणूक आमच्यासाठी प्रतिष्ठेची नाही, तर बेस्ट कामगारांच्या सन्मानाची आहे. गेली २५ वर्षे कामगारांना वेठबिगारासारखे गृहीत धरले गेले. मिल कामगारांना घरे मिळतात, मग बेस्ट कामगारांना का नाही? आम्ही पाच युनियन्ससह ‘समृद्धी पॅनल’ घेऊन निवडणूक लढवत आहोत,” असे दरेकर म्हणाले. “ठाकरे गटाला आता राज ठाकरेंची गरज भासत आहे. कामगार प्रसाद लाड यांच्या पाठीशी उभे राहतील. आम्ही ब्रँडसाठी नव्हे, तर कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी लढत आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.