“आम्हाला निवडून यायचं होतं, म्हणून कर्जमाफी करू सांगितलं”; अजित पवारांच्या विधानावर राजू शेट्टींचे प्रत्युत्तर

Ajit Pawar And Raju Shetty | शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी प्रहार संघघटनेचे नेते बच्चू कडूंनी नागपूरपर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे निर्माण झालेल्या चक्काजाम परिस्थितीनंतर सरकारला अखेर दखल घ्यावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय ३० जून २०२६ पर्यंत घेण्यात येईल अशी तारीख जाहीर केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाच्या ६४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी सातत्याने शेतकरी कर्जमाफी करण्यावरून नाराजी व्यक्त केली. ‘सारखंच फुकटात, सारखंच फुकटात आणि सारखंच माफ, सारखंच माफ; कसं व्हायचं?’ असे म्हणत अजित पवारांनी कर्जमाफीच्या मागणीवरून शेतकऱ्यांना सुनावले. Ajit Pawar And Raju Shetty |
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
“कर्जमाफीबाबत जूनला निर्णय घ्यायचं ठरलंय. तो कसा होईल ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. तुम्हीपण शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळी पैसे फेडायची सवय लावा ना. सारखंच फुकटात, सारखंच फुकटात आणि सारखंच माफ, सारखंच माफ, कसं व्हायचं? असं नाही चालत. एकदा शरद पवारांनी कर्जमाफी केली. एकदा देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी केली. एकदा आम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये केली. आता आम्हाला पुन्हा निवडून यायचं होतं, आम्ही सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू, करा माफ. लोक काय म्हणतात, तुम्ही सांगितलं ना, मग करा.
“जो शब्द दिला, ते करताना आज काही हजार कोटी रुपये त्याला लागणार आहेत. जितकी मदत करायला पाहिजे, तितकी करेन; पण सारखीच मदत नाही. काही तुम्हीपण हातपाय हलवा”, असे अजित पवार यांनी शेतकऱ्यांनाही सुनावले. मात्र यावर राजू शेट्टी यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे. Ajit Pawar And Raju Shetty |
वारंवार कर्जमाफी मागायला आम्ही काय भिकारी नाही – राजू शेट्टी
“शेतकरी काही भीक मागत नाही. मला अजित पवारांचं मान्य आहे. पण त्यासाठी आधी सरकार म्हणून अजित पवारांनी एक व्यवस्था करावी. महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतमाल विकण्याची वेळ येणार नाही अशी धोरणं सरकारनं तयार करावीत. त्यांच्याकडे वारंवार कर्जमाफी मागायला आम्ही काय भिकारी नाही”, असं राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या वतीने अजित पवारांना म्हणाले आहेत. Ajit Pawar And Raju Shetty |
हेही वाचा:
तारीख ठरली ! डीके शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री? पत्रकाराने सवाल करताच सिद्धरामय्या भडकले





