“…भाजपाने स्वतःच्या थोबाडीत मारो आंदोलन केले पाहिजे” ; राज ठाकरेंचा शिलेदार असं का म्हणाला?

Gajanan Kale Facebook post : आज १ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता मुंबईत मतदार याद्यांमधील घोळ तसेच आदी मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘सत्याचा मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात महाविकास आघाडीतील पक्ष देखील सहभागी होणार असल्याने कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मोर्चा स्थळी पोहचण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई लोकलचा प्रवास केला. राज-उद्धव ठाकरे दोघेही या मोर्चातून एकत्र चालणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर राज ठाकरे यांच्या शिलेदाराने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मनसे – महाविकास आघाडीच्या आजच्या सत्याच्या मोर्चाला प्रतिउत्तर म्हणून भाजपाने मूक आंदोलन न करता स्वतःच्या “थोबाडीत मारा आंदोलन” केले पाहिजे, असे मनसेचे गजानन काळे यांनी म्हटले आहे. यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणे महत्वाचे असणार आहे.
मतदार यादीतील दोष दूर करून निवडणुकांना सामोरे जायची तयारी आहे, हे बोलण्याची हिम्मत भाजपाने अगोदर दाखवावी असे थेट आव्हान करत बाकी, सदोष यादीबद्दल मूक असणाऱ्यांना मूक आंदोलनच सुचणार, असा चिमटा मनसे नेत्याने भाजपला काढला आहे.
आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे, याचे कारण मतदार याद्यांमधील घोळ आदी मुद्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना एकी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.





