‘आपल्याला अजुन बरेच काही मिळवायचे आहे…’; चिराग पासवान यांनी आठवला संघर्षाचा काळ

Chirag Paswan – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान आणि त्यांचा लोकजनशक्ती पक्ष एनडीएसाठी अत्यंत महत्वाचा ठरला. निवडणुकीच्या अगदी चार महिने अगोदरची स्थिती पाहिली तर बिहारमध्ये चिराग यांचा पक्ष आयसीयुत दाखल झाल्यासारखाच होता.
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १३ जून रोजी चिराग यांनी त्यांच्या आयुष्यातील सगळ्यांत मोठ्या संकटाला तोंड दिले होते. त्यांचे काका पशुपती पारस यांनी बंडखोरी करत पक्षात उभी फूट पाडली होती. मात्र आज पारस यांचे अस्तित्व जवळपास संपले असून चिराग बिहारमधील एक मोठी शक्ती म्हणून उदयाला आले आहेत.
पशुपती पारस यांनी रचलेल्या सापळ्यात चिराग तेंव्हा अडकले आणि त्यांच्या सर्वच खासदारांनी त्यांची साथ सोडली होती. त्या दिवसाचे स्मरण करून चिराग यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले १३ जून २०२१ रोजी पक्ष फुटला. केवळ पक्षातच नाही तर कुटुंबातही फुट पडली. पक्षाचे नाव, चिन्ह आणि कार्यालयही आपण गमावले आणि पुन्हा नव्याने सुरूवात केली.
यावेळी आव्हाने होती आणि रामविलास पासवान यांचे मार्गदर्शनही आपल्याला नव्हते. अशा स्थितीत जे लोक आपल्या विरोधात उभे होते ते आपल्याकडून काही चूक होते का याची वाट पाहत होते. आपला पक्ष पुन्हा मागची कामगिरी करू शकणार नाही असा संदेश पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्याच अनेक जणांनी आपल्याला धोका देण्याचा प्रयत्न केला.
दिल्लीत आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पुढे बोलताना चिराग म्हणाले आपल्याला अजुन बरेच काही मिळवायचे आहे. येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मोठ्या संघर्षानंतर आपण या ऊंचीवर पोहोचलो आहोत आणि भूतकाळातून आपल्याला धडा घ्यावा लागेल. केंद्रात मला मंत्रिपदाची जी जबाबदारी देण्यात आली आहे ती मी निष्ठेने पार पाडेल.
पशुपती पारस यांच्याकडून धक्का बसल्यानंतर चिराग पासवान बराच काळ एकटे पडले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीने पारस यांना धक्का देत चिराग यांना जवळ केले.
त्यांना लोकसभेच्या पाच जागा सोडण्यात आल्या. या पाचही जागांवर चिराग यांच्या गटाचा विजय झाला. भाजपला पूर्ण बहुमत आता मिळालेले नाही. त्यामुळे चिराग यांच्या पाच जागा आता भाजपसाठी अत्यंत महत्वाच्या ठरल्या आहेत.





