Dengue Vaccine : देशातील पहिल्या डेंग्यू लसीला केंद्राची मंजुरी; ‘या’ वयोगटातील लोकांना देणार लस
'सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन'ने लसीची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे सर्वसमावेशक मूल्यमापन केल्यानंतर ही मंजुरी दिली.

Dengue Vaccine : डेंग्यू या धोकादायक कीटकजन्य आजारावर मात करण्यासाठी भारताने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने ‘टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडिया’च्या ‘क्यूडेंगा’ या डेंग्यू प्रतिबंधक लसीला भारतात बाजारात आणण्याची (मार्केट ऑथोरायझेशन) अधिकृत परवानगी दिली आहे.
‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ने लसीची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे सर्वसमावेशक मूल्यमापन केल्यानंतर ही मंजुरी दिली. डेंग्यू रोखण्यासाठी देशात मंजूर झालेली ही पहिलीच लस आहे.
ही लस जर्मनीतील ‘टाकेडा जीएमबीएच’ द्वारे उत्पादित केली जाणार असून, भारतात ‘टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडिया’द्वारे आयात केली जाईल. ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, १९४०’ च्या नियमांनुसार ही मान्यता देण्यात आली आहे.
‘क्यूडेंगा’ ही ‘रिकॉम्बिनंट डीएनए’ तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेली ‘लाइव्ह ॲटेन्युएटेड टेट्राव्हॅलेंट’ लस आहे. ही लस त्वचेखालील इंजेक्शनद्वारे दिली जाते. ४ ते ६० वयोगटातील व्यक्तींसाठी ही लस उपयुक्त ठरेल. लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार, तीन महिन्यांच्या अंतराने (० आणि ३ महिने) ०.५ मिलीचे दोन डोस दिले जातील.
भारतातील ‘फेज-३’ क्लिनिकल चाचण्यांव्यतिरिक्त ब्राझील, थायलंड आणि श्रीलंका यांसारख्या देशांमधील व्यापक अभ्यासाच्या आधारे ही मंजुरी मिळाली आहे. ‘क्यूडेंगा’ लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम आणि थायलंडसह जगातील ४२ देशांमध्ये आधीच मान्यता मिळालेली असून, जागतिक आरोग्य संघटनेची पूर्व-पात्रताही प्राप्त झाली आहे.
जागतिक स्तरावर या लसीचे २.४ कोटींहून अधिक डोस वितरित करण्यात आले असून ती सुरक्षित सिद्ध झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ही लस भारतातील डेंग्यूविरुद्धच्या लढ्याला मोठा पाठबळ देईल आणि राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांना पूरक ठरेल.





