आम्हाला तुमची आठवण येते..!

आयकर विभागाची गांधीगिरी : विवरण दाखल न केलेल्या करदात्यांना पाठविला इ-मेल
पुणे – प्राप्तीकर विवरणपत्र दाखल न केलेल्या करदात्यांना विवरणपत्र दाखल करण्यासाठी अद्यापही मुदत असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी प्राप्तीकर विभागाने अनोखी शक्कल लढविली आहे. ‘We miss you’ आम्हाला तुमची आठवण येते अशा शब्दात करदात्यांना प्राप्तीकर विभागाचे तुमच्यावर लक्ष आहे, असा मेसेज ई-मेलद्वारे पाठविला आहे. त्यामुळे एरवी कर चुकविल्यास येणारी नोटीस आणि अचानक पडणाऱ्या धाडीमुळे धास्तावलेल्या करदात्यांमध्ये प्राप्तीकर विभागाची ही गांधीगिरी चर्चेचा विषय बनली आहे.
गेल्या वर्षीचे विवरण सादर करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. ज्यांनी विवरण दाखल केले नाही. त्यांच्याकडे प्राप्तिकर विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. ज्या करदात्यांनी अद्याप विवरणपत्र भरलेले नाही, त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी हा इ-मेल पाठविण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2017-18 किंवा 2018-19 साठीचे विवरण सादर न केलेल्या करदात्यांना पाठविलेल्या या ई-मेलमध्ये कर विभागाने, “आपण विवरण सादर केलेले नाही. आम्हाला तुमची आठवण येते. आपण नियमितपणे विवरण सादर करणारे आहात. मात्र, यावर्षी आपण विवरण सादर केलेले नाही. त्यासाठी एक छोटीशी आठवण करून देत आहोत.’ अशा सौम्य शब्दात सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, आपण 31 मार्च 2020 पर्यंत दंडासह विवरण दाखल करू शकतात. आम्ही आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहोत, असे विभागाने म्हटले आहे.
म्हणून विवरणपत्र दाखल करणे गरजेचे
गेल्या वर्षाचे विवरण दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. नंतर ती 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. मागील वर्षाचे उत्पन्न करपात्र नसले तरीही विवरण दाखल केल्यानंतर तुमचे योग्य प्रकारे रेकॉर्ड रहाते. याचा उपयोग तुम्हाला आगामी काळात कर्ज घेणे आणि इतर बाबींसाठी होऊ शकतो. ज्यांनी विवरण सादर करण्याची गरज असूनही केलेले नसेल त्यांना 31 डिसेंबरपर्यंत 5 हजार रुपये दंड देऊन तर, 31 मार्चपर्यंत 10 हजार रुपये दंड देऊन विवरण सादर करता येऊ शकते. जर एकूण उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नसेल तर, दंड 1 हजार रुपयांपेक्षा जास्त होणार नाही. मात्र, जर काही कर देणे बाकी असेल तर दंडाशिवाय त्यावर मासिक एक टक्का व्याज लागते.





