Water Tanker Pune : पुणेकरांची तहान वाढतेय..! शहरात टँकर फेऱ्यांचा ५ लाखांचा टप्पा पार; भीषण वास्तव समोर
Water Tanker Pune : मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये विहिरी आटल्या; वाढत्या उन्हामुळे पाणीपुरवठा विस्कळीत, टँकरसाठी सोसायट्यांची प्रतीक्षा यादी लांबली.

Water Tanker Pune – गेल्या तीन वर्षांपासून शहराचे वाढते तापमान, वाढलेल्या नागरिकांमुळे पाण्याची वाढलेली मागणी आणि महापालिकेस शहराला पाणीपुरवठा करताना येणाऱ्या अपयशामुळे पुणेकरांना आपली तहान भागविण्यासाठी वाढती टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरात पाण्याच्या टँकरची मागणी वर्षाला ५० हजार फेऱ्यांनी वाढली आहे.
एप्रिल २०२३ ते मार्च २४ मध्ये सुमारे ४ लाख ३४८ फेऱ्या झाल्या होत्या. ही संख्या एप्रिल २०२४ ते मार्च २५ पर्यंत ४ लाख ८९ हजारांवर गेली होती. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ अखेर ही संख्या तब्बल ५ लाख १७ हजारांवर गेली. यातून गेल्या दोन वर्षांत सरासरी ५० ते ५५ हजार टँकरच्या फेऱ्या वाढल्याचे दिसते.
मार्च मध्ये तब्बल ५८ हजार फेऱ्या
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील नोंदीनुसार, मार्च २०२४ मध्ये शहरभर टँकरच्या सुमारे ३८ हजार २९९ फेऱ्या झाल्या होत्या. मार्च २०२५ मध्ये या फेऱ्यांची संख्या सुमारे ४७ हजार ८९६ वर पोहोचली. यंदाच्या मार्च २०२६ मध्ये ही संख्या थेट ५८ हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा १ ते २६ एप्रिल या २६ दिवसांतच टँकरच्या ५५ हजारांहून अधिक फेऱ्या झाल्या आहेत. महिन्याच्या उर्वरित दिवसांतील मागणी लक्षात घेता एप्रिलअखेर हा आकडा ६२ ते ६३ हजार फेऱ्यांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला आहे.
सर्वच भागांत वाढली मागणी
शहराच्या मध्यवर्ती भागांसह नव्याने समाविष्ट झालेल्या उपनगरांमध्येही टँकरवरील अवलंबित्व वाढले आहे. विहिरींची पातळी घटणे, धरणसाठ्यातील मर्यादित उपलब्धता आणि वाढते तापमान यामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांना पर्यायी पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्याची तीव्रता मे महिन्यात आणखी वाढण्याची शक्यता असल्याने टँकरची मागणी आणखी वाढू शकते, अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.
उपायाचा फायदा होईना?
महापालिका प्रशासनाकडून संपूर्ण शहरात समान पाणीपुरवठा करण्यासाठी २०१७ पासून समान पाणी योजनेचे काम सुरू करण्यात आले. या योजनेसाठी सुमारे २५०० कोटी रुपये खर्चून ८२ पाण्याच्या टाक्या उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते, तसेच पाण्याच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सुमारे २ लाख ८० हजार पाणीमीटर बसविणे आणि नव्याने १६०० किलोमीटर जलवाहिन्या टाकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
मात्र, गेल्या नऊ वर्षांपासून योजना सुरू असतानाही आतापर्यंत केवळ ३० ते ३५ टक्के टाक्याच कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समान पाणी योजनेचा अपेक्षित परिणाम अद्यापही दिसत नसल्याने टँकरची मागणी वाढली आहे.






