Shirur Water Scarcity: शिरूर तालुक्यात पावसाची दांडी! खरीप पिके कोमेजली; रब्बीचेही गणित धोक्यात
Shirur Water Scarcity: खरीपातील पिके जगवायची कशी आणि जनावरांसाठी चार्याची व्यवस्था कशी करायची, असा दुहेरी प्रश्न शेतकरी व पशुपालकांसमोर उभा राहिला आहे.

Shirur Water Scarcity – शिरूर तालुक्यात यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. काही गावांचा अपवाद वगळता अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसून, मागील दोन महिन्यांपासून ढगाळ वातावरण आणि तुरळक हलक्या सरींवरच शेतकर्यांना समाधान मानावे लागत आहे. खरीपातील पिके जगवायची कशी आणि जनावरांसाठी चार्याची व्यवस्था कशी करायची,
असा दुहेरी प्रश्न शेतकरी व पशुपालकांसमोर उभा राहिला आहे. गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने पिके कोमेजू लागली आहेत. सुरुवातीला झालेल्या काही प्रमाणातील पावसावर विश्वास ठेवून अनेक शेतकर्यांनी धाडसाने बाजरी, सोयाबीन, मका, तूर, उडीद आणि मूग या खरीप पिकांची लागवड केली. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने ही पिके धोक्यात आली आहेत.
पेरणी केलेल्या पिकांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकर्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होत आहे. शिरूर तालुक्यातील काही भागांतील शेतीला चासकमान कालवा, घोडनदी, कुकडी नदी, डिंभा उजवा कालवा आणि कुकडी कालव्याच्या पाण्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
मात्र, कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, पाबळ, शास्ताबाद, मोराची चिंचोली, वाघाळे, गणेगाव आणि लाखेवाडी या भागातील कोरडवाहू शेतकर्यांची परिस्थिती बिकट आहे. कालव्याच्या पाण्याचा लाभ सर्वच शेतकर्यांना मिळत नसल्याने पावसाशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.
डिंभा उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने कालव्याखालील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होऊन बागायती शेतीला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील रब्बी हंगामाचा विचार करता जोरदार पाऊस होऊन नाले, ओढे आणि जलस्रोत भरून भूजलपातळीत वाढ होणे अत्यावश्यक आहे.
खरीपानंतर रब्बीचेही गणित धोक्यात
सध्या शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. आता जोरदार पाऊस झाला नाही, तर केवळ खरीप हंगामच नव्हे तर पुढील रब्बी हंगामाचेही गणित बिघडण्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. पिके आणि जनावरांचा चारा वाचविण्यासाठी पावसाची तातडीने गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत.





