Baramati News: माळेगाव कारखान्याची पहिली उचल जाहीर; एफआरपीपेक्षा ‘इतके’ रुपये जास्त मिळणार

प्रभात वृत्तससेवा
माळेगाव – माळेगाव सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या गळितासाठी पहिली उचल म्हणून प्रतिटन ३३०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला.
या हंगामासाठी कारखान्याचा एफ.आर.पी. दर ३२७० रुपये प्रतिटन निश्चित झाला असताना, संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून एफ.आर.पी. पेक्षा ३० रुपये अधिक, म्हणजेच ३३०० रुपयांची उचल देण्यास मान्यता दिली. सोमेश्वर व छत्रपती सहकारी साखर कारखान्यांनी उचल रकमेची घोषणा केल्यानंतर माळेगाव कारखान्याच्या निर्णयाकडे सभासदांचे लक्ष लागले होते.
यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण असून, हंगामी खर्चासाठी ही आगाऊ रक्कम महत्त्वाची ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी या निर्णयाची माहिती दिली.





