पुणे | धरणातून सोडलेले पाणी, जादा पावसामुळे पूरस्थिती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी अन् जादा पाऊस यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आले. या एकत्रित पाण्यामुळे नदीपात्रातील पातळी वाढली. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
महापालिकेतील नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. गुरुवारी रात्रीपासून शहरभर पावसाची संततधार होती. खडकवासला धरण परिसरातही पावसाचा जोर होता.
त्यामुळे धरणातून पहाटे 35 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे नागरी वस्तीत पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार तातडीने मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले आणि महापालिकेत येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूरस्थितीचा आढावा घेतला.
या वेळी पवार यांनी सांगितले, की, खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. हे धरण लहान आहे. जादा पावसाने धरण क्षेत्रात पाणी वाढल्याने विसर्ग वाढविण्यात आला, तसेच शहरातही पाऊस होता.
त्यामुळे नदीपात्रात पातळी वाढली. यामुळे सोसायट्यांमधील भागात पाणी शिरले. सद्यस्थितीत खडकवासला धरणातील साठा कमी करायला सांगितला आहे. पाऊसही कमी झाला आहे. शासन आणि प्रशासन कोणीही नागरिक अडचणीत राहणार नाही, याची काळजी घेत आहे. परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पवार यांनी केले.
त्यांची चौकशी करून कारवाई
नदीपात्रात राडारोडा टाकला जातो, तसेच काही बिल्डरांनी ओढे-नाले अडविले आहेत, यावर विचारले असता पवार यांनी सांगितले, की राडारोडा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. नागरिकांचीही जबाबदारी आहे, त्यांनी याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावी. जर बिल्डरांनी ओढे- नाले अडविले असतील, तर त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.




