Water Leakage: विद्यापीठ चौकात लाखो लीटर पाणी वाया! महापालिकेचा भोंगळ कारभार उघड
Water Leakage: पाषाण, औंध आणि बोपोडीला पाणी पुरवणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांचा घोळ; रस्ता खाली गाडलेल्या जुन्या वाहिन्यांमुळे महापालिकेला गळती शोधण्यात अपयश.

Water Leakage – शहरात दिवसाआड पाणीकपात सुरू असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाच्या कामासाठी औंधच्या दिशेला खोदलेल्या रॅम्पच्या खड्ड्यात दररोज लाखो लीटर पाणी साचत आहे. हे पाणी मोटारी लावून उपसले जात आहे. या पाण्यामुळे पुलाच्या कामावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने या ठिकाणी असलेल्या जलवाहिनीची गळती थांबविण्याची मागणी पीएमआरडीएने पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे केली आहे.
महापालिकेने यापूर्वीही ही गळती शोधल्याचे सांगत या ठिकाणी जलवाहिनी दुरूस्त केली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा मोठया प्रमाणात गळतीचे पाणी रॅम्पसाठीच्या खड्डयात येत आहे. महापालिकेच्या चतृश्रृंगी पाण्याच्या टाक्यांमधून पाषाण तसेच औंध आणि बोपोडीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्याच्या या चौकात विखूरलेल्या आहेत. उड्डाण पुलाच्या कामासाठी त्यातील काही जलवाहिन्यांचे स्थलांतर महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते.
तर, काही जुन्या जलवाहिन्या माॅर्डन महाविद्यालयाच्या बाजुने गेलेल्या असून त्यावर रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे, महापालिकेस या भागात गळतीच सापडत नसल्याचे समोर आले आहे. पीएमआरडीएकडून या पुलाचे दोन रस्ते सुरू करण्यात आले असून आता औंधच्या दिशेने जाणाऱ्या रॅम्पचे काम बाकी आहे. मात्र, या कामासाठी खड्डा खोदण्यात आल्यानंतर दिड वर्षांपासून या खड्डयात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.
तर, हे पाणी उपसण्यासाठी तासन् तास मोटारी लावल्या जात असल्याने कामासाठी कमी वेळ मिळत आहे. सतत येणाऱ्या या पाण्यामुळे कामही निकृष्ट दर्जाचे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ही गळती रोखण्यासाठी पीएमआरडीएने महापालिकेने यापूर्वीच पत्र दिली होती. त्यानंतर काही ठिकाणी गळती सापडली तसेच पालिकेने ती दुरूस्तही केली. मात्र, आता पुन्हा नव्याने रॅम्पमध्ये पाणी साचत आहे.या गळतीद्वारे लाखो लीटर पाणीही टंचाईच्या काळात वाया जात आहे.




