Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘इतके’ दिवस पाणीकपात राहणार’; आयुक्त नवल किशोर राम यांचे स्पष्टीकरण
Pune Water Cut: पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी शहरात तीन नवीन टँकर पॉईंट उभारणार; नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश.

Pune Water Cut : आगामी काळात पावसाचा अंदाज समाधानकारक नसल्याने पुढील तीन महिने पाणीकपातीला पर्याय नसल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी स्पष्ट केले. पालिकेच्या मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिवसाआड पाणीपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आयुक्तांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. आयुक्त म्हणाले, खडकवासला धरणसाखळीत सध्या केवळ ३.८८ टीएमसी पाणीसाठा आहे. पाणीकपातीपूर्वी शहराला दरमहा १.६० टीएमसी पाण्याची गरज होती.
कपातीनंतर ही आवश्यकता १.२० टीएमसीपर्यंत खाली आली आहे. सध्याचा साठा तीन महिने शहराला पुरेल. पाण्याची स्थिती २०१५ प्रमाणे राहिल्यास पुढील वर्षाच्या पाणी नियोजनाचाही विचार आतापासून करावा लागणार आहे. पालिकेने पाणीपुरवठा व्यवस्था, साठवण क्षमता आणि वितरण व्यवस्थेच्या अभ्यासावर आधारित नियोजन केले आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे जलवाहिन्यांमध्ये हवेची पोकळी निर्माण होत असून त्याचा परिणाम काही भागांत कमी दाबाने पाणी येण्यावर होत आहे.
यावर उपाययोजना सुरू असून नागरिक आणि नगरसेवकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने प्रत्येक भागातील समस्या सोडविण्याचे काम सुरू असून तीन नवीन टॅंकर पॉईंट उभारण्याचे कामही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
वाघोलीला लष्कर जलकेंद्राचे पाणी
भीमा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने वाघोली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा जॅकवेल बंद झाला असून गेल्या पाच दिवसांपासून वाघोली परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून ती योजना लष्कर जलकेंद्राच्या जलवाहिनीशी जोडून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.वाघोली परिसरात ३० ते ४० ठिकाणी तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
तातडीनं उपाययोजना करा
महापौरांनी नगरसेवकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. शहरात मोठ्या प्रमाणावर जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांकडून आलेल्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी. तसेच पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात प्रभावी पावले उचलावीत, अशाही सूचना केल्या.






