Khadakwasla Dam: ऐन उन्हाळ्यात पाणीकपातीचे संकट ? खडकवासला धरण साखळीबाबत धक्कादायक माहिती समोर
Khadakwasla Dam: सप्टेंबर महिन्यात पावसाने दांडी मारल्याने खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी; पुढील १० महिन्यांचे नियोजन आवश्यक.

Khadakwasla Dam – सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिल्याने खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १.२१ टीएमसीने कमी झाला आहे. सध्या चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा असला, तरी यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता पुणे शहरात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पुढील दहा महिन्यांचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक आहे.
अन्यथा उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन ऐनवेळी पाणीकपात लागू करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यंदा ‘अल-निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज मार्च महिन्यातच व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यानंतर काही काळ पावसाने दडी मारली. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे जवळपास काठोकाठ भरली.
कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्गही करावा लागला. सद्यःस्थितीत खडकवासला प्रकल्पात २७.८५ टीएमसी म्हणजे ९५.५५ टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी खडकवासला धरण साखळीत २९.०६ टीएमसी म्हणजेच ९९.६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. राज्य शासनाने पाण्याच्या वापरासाठी प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत.
त्यामध्ये पिण्याच्या पाण्याला प्रथम, त्यानंतर शेती आणि उद्योगाला प्राधान्य देण्यात आले आहे. खडकवासला धरण साखळीतील पाण्यावर पुणे शहराची पिण्याच्या पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तसेच, हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यांतील पिण्याचे पाणी आणि शेतीसाठीही या प्रकल्पातून पाणी सोडले जाते. त्यामुळे शहरासाठी लागणारे पाणी, शेतीसाठीची आवर्तने,
धरणातील बाष्पीभवन तसेच पुढील मान्सूनपर्यंतचा कालावधी यांचा एकत्रित विचार करून जलसंपदा विभाग आणि महापालिकेने उपलब्ध पाणीसाठ्याचे वर्षभराचे नियोजन करण्याची गरज आहे. मागील काही वर्षांपासून जूनपर्यंत अपेक्षित पाऊस होत नसल्याने धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक कमी राहते. परिणामी, पाणीटंचाई आणि कपातीचे संकट निर्माण होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी आतापासून काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
धरणाचे नाव – उपलब्ध पाणीसाठा – टक्केवारी
1.खडकवासला – १ टीएमसी – ५०.६३ टक्के
2.पानशेत – १०.४१ टीएमसी – ९७.७९ टक्के
3.वरसगाव – १२.७३ टीएमसी – ९९.३२ टक्के
4.टेमघर- ३.७१ टीएमसी – १०० टक्के
यंदा १९ टीएमसी पाण्याचा विसर्ग
यंदा कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने खडकवासला प्रकल्पातील धरणे ओसंडून वाहू लागली. टेमघर, वरसगाव आणि पानशेत या तीन धरणांतून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणात जमा होते. त्यानंतर खडकवासला धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येतो. यंदा आतापर्यंत सुमारे १९ टीएमसी पाणी नदीमध्ये सोडण्यात आले आहे.






