SPPU Mess: पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना निलंबित! आता रोज हजारो विद्यार्थ्यांच्या जेवणाचं काय ?
SPPU Mess: अन्नाचा निकृष्ट दर्जा आणि अस्वच्छतेमुळे अन्न व औषध प्रशासनाची (FDA) मोठी कारवाई; पुणे विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीचा परवाना निलंबित.

SPPU Mess – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीमध्ये (मेस) मिळणारे निकृष्ट दर्जाचे अन्न आणि जेवणात वारंवार सापडणाऱ्या अळ्यांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींची अखेर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गंभीर दखल घेतली आहे. एफडीएने विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीची अचानक तपासणी करत, तिथे आढळलेली प्रचंड अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेतील गंभीर त्रुटींमुळे मेसचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे.
विद्यापीठातील रिफेक्ट्रीत तपासणीदरम्यान अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण आणि अन्न हाताळण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत. कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, कीटक प्रतिबंधक उपायांचा अभाव, तसेच कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे कोणतेही रेकॉर्ड नसणे, अशा निष्काळजीपणावर एफडीएने बोट ठेवले. यापूर्वी गॅस तुटवड्याचे कारण देत कमी जेवण देणे, अन्नात अळ्या व झुरळे सापडणे आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी उद्धट वर्तन करणे, अशा अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या.
दररोज हजारो विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिक या मेसवर अवलंबून असतात. या धडक कारवाईमुळे आतातरी रिफेक्ट्रीच्या अन्नाचा दर्जा सुधारेल आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ, सकस भोजन मिळेल, अशी आशा विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एफडीएने संबंधित भोजनालयाचा परवाना निलंबित केला आहे. येथील विद्यार्थ्यांना जेवणाची सोय विद्यापीठाच्या अन्य भोजनालयात करण्यात आली आहे, तसेच सर्व आवश्यक बाबी पूर्ण करून आणि सर्व उपाययोजनासह पुन्हा भोजनालय सुरू केले जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.





