Water conduit: सव्वाशे फूट उंचीचे कारंजे! दुष्काळात तेरावा महिना; सुमारे तीन साडेतीन तास पाणी गळती
Water conduit:

Water conduit: आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टीजवळ वडगाव ते वंडर सिटी पंपिंग स्टेशन दरम्यान जाणाऱ्या १४१६ मिमी व्यासाच्या समान पाणीपुरवठा जलवाहिनीचा जॉइंट फुटून समोर सव्वाशे फूट उंच कारंजे निर्माण झाले होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.
दुपारी १:३८ च्या सुमारास झालेल्या या घटनेत पाण्याच्या प्रचंड दाबामुळे सुमारे तीन साडेतीन तासात लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याच्या प्रेशरने घटनास्थळी मोठा खड्डा पडला असून, परिसरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. रस्ते जलमय झाल्याने वाहतूक व दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले.
एल अँड टी (L&T) कंपनीमार्फत उभारण्यात आलेल्या या २४x७ जलवाहिनीचे काम २०२३ मध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, कंत्राटदार कंपनीच्या कामाच्या दर्जाबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. दुपारी ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची टंचाई असताना, पुण्यात पाणी बचतीसाठी कपात लागू आहे. अशा वेळी लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जलवाहिनीत एअर व्हॉल्व्ह असूनही एअर प्रेशरमुळे पाइप कसा तडकला, यामागे कंत्राटदाराचा हलगर्जीपणा आहे की तांत्रिक बिघाड, यावरून नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे. जलवाहिनीच्या कामाची तातडीने चौकशी करून जबाबदार घटकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शिवसृष्टीजवळ समान पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जॉइंटवर क्रॅक होऊन प्रेशरमुळे फुटली. तातडीने पाणीपुरवठा बंद करून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.
– मुकेश पवार, उपअभियंता, समान पाणीपुरवठा विभाग





